
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : ठाण्यातील मीरा रोड येथील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकावर दोन दिवसांपूर्वी मराठी बोलण्याच्या वादावरून मनसे कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारत या मारहाणीचा निषेध केला आहे. दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला शारीरिकदृष्ट्या इजा पोहोचवली.
शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अँड नमकीनच्या दुकानावर हा हल्ला झाला. दोन दिवसांपूर्वी, दुकानदाराने मराठीत संवाद साधण्यास नकार दिला, त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर शारीरिक हल्ला केला. या घटनेनंतर, एकता मंचच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन निषेध प्रदर्शन केले आणि दुकाने बंद ठेवली.
घटनेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेने संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली. व्यापारी संघटनेने सांगितले की, ही घटना केवळ भाषेच्या वादावर आधारित नाही, तर ती एक गंभीर समाजिक समस्या आहे. त्यांनी सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांना थांबवता येईल.
घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की, “एफआयआर दाखल झाला आहे आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. आम्ही सर्वांना शांततेत राहण्याची आणि कोणत्याही अफवा पसरवू नयेत, अशी विनंती करतो.” पोलिसांनी आंदोलन करणार्याा व्यापाऱ्यांना समजून सांगितले आणि शांततेच्या वातावरणात निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले.
व्यापारी संघटनांनी आंदोलन सुरू ठेवण्याचे सांगितले असून, भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाला कडक पावले उचलण्याची सूचना केली आहे. हे आंदोलन इतर शहरांमध्ये पसरण्याची शक्यता असून, मराठी भाषेच्या मुद्द्यावर समाजात संघर्ष होण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
मीरा-भाईंदरमधील हा वाद पुन्हा एकदा भासिक आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा निर्माण करत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समाजातील शांततेसाठी प्रशासनाने योग्य आणि वेगाने कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरते.