माणदेश एक्सप्रेस न्युज/ कल्याण: रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अतंर्गत सुरु असलेल्या पूलाच्या कामासाठी रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान एका तरुणाला खासगी सुरक्षा रक्षकाने त्या दिशेने जाण्यासाठी मज्जाव केला. या कारणावरून सुरक्षारक्षक आणि त्या तरुणामध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षकाने तरुणाला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. राजकुमार यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे पळून गेलेल्या राहुल शिंदे, सचिन शिंदे आणि विजय ढांगे या ३ सुरक्षा रक्षकांना बेड्या ठोकल्यात.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिमेला स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसरात उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान हे काम सुरु असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पूलाखालील रस्त्यावर काही ठिकाणी बॅरिकेटिंग करत कोणती दुर्घटना घडू नये यासाठी लोकांना ये जा करण्यासाठी मज्जाव करण्यात येतो . सोमवारी मध्यरात्री पूलाचे काम सुरु होते. या दरम्यान एक बॅरिकेटिंगच्या दिशेने आला. त्याला त्याठिकाणी असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाने अडवले आणि त्याठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केला. यावरुन राजकुमार यादव आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला.
वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. या दरम्यान राजकुमार हा खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. हे पाहून मारहाण करणारे सुरक्षा रक्षक घाबरून पळून गेले. राजकुमार यादव हा मूळचा बंगालचा असून तो सध्या मालाड येथे राहत होता. काही कामानिमित्त तो कल्याणला आला होता. तेव्हा ही धक्कादायक घटना घडली.