इंडोनेशियात एका अजगराच्या पोटात एक महिला मृतावस्थेत आढळली आहे.हे अजगर क्वचितच माणसं खातात. मात्र मागील महिनाभरात ही दुसरी घटना समोर आली आहे.36 वर्षांच्या सिरिआती मंगळवारपासून बेपत्ता होत्या. आपल्या मुलासाठी औषधे आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या आणि त्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दक्षिण सुलावेसी प्रांतातील सितेबा गावात हे कुटुंब राहतं. सिरिआती यांचे पती अडिआन्सा यांना त्यांच्या घरापासून 500 मीटर्स अंतरावर सिरिआती यांच्या स्लिपर्स आणि इतर कपडे सापडल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
बीबीसीशी बोलताना स्थानिक पोलिस प्रमुख इदुल म्हणाले की, “मृत महिलेच्या पतीला जिवंत अजगर सापडला आणि त्यांनी अजगराचे डोकं कापून टाकलं. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीचे अवशेष पाहण्यासाठी अजगराचं फुगलेलं पोट फाडलं.”
याआधी जून महिन्यात दक्षिण सुलावेसी प्रांतातील आणखी एका जिल्ह्यात एका महिलेचं मृत्यू झाला होता. या महिलेला पाच मीटर लांब अजगरानं गिळलं होतं.
पोलिसांनी रहिवाशांना नेहमीच चाकू सोबत ठेवण्याचा आणि त्या हल्ल्यानंतर अजगराच्या हल्ल्याचा अंदाज घेण्याचा सल्ला दिला आहे.दक्षिण सुलावेसी पर्यावरण इन्स्टिट्यूटमधील पर्यावरणवाद्यांना वाटतं की, जंगलतोड आणि प्राण्यांकडून होत असलेल्या या प्रकारच्या हल्ल्यांचा एकमेकांशी मोठा संबंध आहे.
या संस्थेचे संचालक असलेले मुहम्मद अल अमिन यांनी बीबीसीला सांगितलं की, या भागात खाणी आणि लागवडीसाठी जमीन मोकळी करण्याचा (जंगलतोड) ट्रेंड लक्षणीयरित्या वाढतो आहे.
“याचा परिणाम असो होतो की हे प्राणी अन्नाच्या शोधात बाहेर पडतात आणि निवासी वस्त्यांमध्ये शिकार करतात. ते अगदी माणसांवर थेट हल्ला करतात.”
पोलिस प्रमुख इदुल म्हणाले, अजगर ज्या प्राण्यांची शिकार करतात त्यापैकी रानडुकरं हे एक आहेत. आपल्या भक्ष्यावर हल्ला करण्यासाठी अजगर लपून बसला होता, असा संशय रहिवाशांना आहे. मात्र आता जंगलामध्ये रानडुकरं क्वचितच आढळतात
इदुल यांनी लोकांना या भागात एकट्यानं कुठेही न जाण्याचं आवाहन केलं आहे.
एक अजगर माणसाला कसं काय खाऊ शकतो?
जाळीसारखे आकार कातडीवर असलेल्या अजगरांची (Reticulated pythons)10 मीटर्सपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.
इंडोनेशियात माणसांना गिळणारे अजगर हे याच प्रजातीचे म्हणजे जाळीसारखे आकार कातडीवर असलेले अजगर (Reticulated pythons) आहेत.
या प्रकारचे अजगर 10 मीटरपेक्षा (32 फूट) जास्त लांब असू शकतात आणि ते खूपच शक्तिशाली असतात.
ते लपून हल्ला करतात. आपल्या शिकारी किंवा भक्ष्याभोवती ते वेटोळे घालतात आणि भक्ष्याला जखडून टाकतात. त्यानंतर ते आपल्या ताकदीचा वापर करून भक्ष्याला चिरडतात.
अजगर त्याला घट्टपणे जखडतात आणि आपल्या वेटोळ्यांची घट्ट पकड त्याच्यावर तयार करतात. या परिस्थितीत भक्ष्याचा श्वास कोंडला जाऊन त्याचा जीव गुदमरू लागतो.
त्यानंतर काही मिनिटांतच भक्ष्यस्थानी पडलेला प्राणी गुदमरतो किंवा त्याला हृदयविकाराचा झटका येतो.
अजगर आपलं भक्ष्य पूर्णपणे गिळतात. त्यांचे जबडे खूपच लवचिक अशा ऊतींनी (ligaments) जोडलेले असतात. त्यामुळे आपल्या मोठ्या भक्ष्याभोवती ते जबडे पसरवू शकतात.