आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करणाऱ्या दोन्ही पोलिसांना  शर्मिला ठाकरे यांच्याकडून 51 हजार रूपये बक्षीस जाहीर

0
755

बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा काल (23 सप्टेंबर) पोलिसांसोबत अचानक झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे काही राजकीय नेत्यांनी या घटनेचं समर्थन केलं आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी सदर घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने ओरोपीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. मी याआधी म्हटलं होतं, की आमचं सरकार असतं तर एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

नेमकं काय घडलं?
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली. त्यानंतर एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारामुळं जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं. जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अक्षय शिंदेच्या दिशेने गोळ्या झाडणारे संजय शिंदे कोण?
पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. संजय शिंदे यांनी यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे देखील होते. संजय शिंदे यांनी यापूर्वी मुंबई पोलिसातही काम केले आहे. सध्या ते बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here