
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदानासाठी घेतलेल्या आठ डायग्नोस्टिक व्हॅनच्या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल अधिवेशन संपण्याआधीच सभागृहासमोर सादर करावा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, “प्रत्येक व्हॅनची किंमत साधारणतः ४० लाखांच्या आत असावी, आणि व्हॅनमध्ये असलेली उपकरणेही १२ लाखांपेक्षा अधिक किंमतीची नाहीत. मात्र, सरकारने या व्हॅन तिप्पट दराने खरेदी केल्या आहेत. एवढंच नव्हे, तर काही व्हॅनमधील उपकरणे सध्या बंद स्थितीत आहेत.”
त्यांनी सरकारला सवाल केला की, “कॅन्सरसारखा जीवघेणा आजार आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅनमध्ये जर यंत्राच बंद असतील, तर ही गंभीर बाब आहे. या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी सुरू आहे असे सांगण्यात येते, पण अद्याप अहवाल समोर आलेला नाही. मग चौकशी नेमकी कुठे पोहोचली आहे?”
वडेट्टीवार यांच्या या मुद्द्यावर सभापतींनी संपूर्ण लक्ष दिले आणि संबंधित विभागाला अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी पूर्ण करून अहवाल सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजावर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांनी याप्रकरणी सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.