
माणदेश एक्सप्रेस न्यूज|फलटण– श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १४१ वर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकून वारकऱ्यांना मारहाण करत ऐवजाची चोरी केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात घडली. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोहळ्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान, दिंडी क्रमांक १४१ ही फलटण हद्दीत मुक्कामी असताना चार ते पाच चोरटे मध्यरात्री दिंडीत घुसले. त्यांनी काही वारकऱ्यांना मारहाण करत त्यांच्याकडील ऐवज लुटून नेल्याची माहिती आहे. काही वारकरी जागे होताच त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
पालखी सोहळ्याचे प्रमुख रामभाऊ चौधरी यांनी सांगितले की, “या प्रकाराने संपूर्ण दिंडी हादरून गेली असून, याआधीही १५-२० वर्षांपूर्वी अशाच स्वरूपाच्या घटना घडल्या होत्या.” या घटनेची माहिती पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संबंधित पोलिस प्रशासनाला देण्यात आली आहे. वारकऱ्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संतांच्या पावन सोहळ्याला गालबोट लावणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यानंतर त्या चोरट्यानी वीस ते पंचवीस लोकांचा जमाव आणून दिंडीतील वारकऱ्यांना मारहाण करून ऐवज चोरून नेला, अशी माहिती दिंडीतील सहभागी वारकऱ्यांनी दिली.