
माणदेश एक्सप्रेस/लेंगरे: खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील जिल्हा परिषदेच्या गुजलेवस्ती शाळेत मध्यान भोजन आहार शिजवण्याच्या खोलीत गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आज, मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज, सकाळी स्वप्नाली संतोष गायकवाड ह्या मध्यान भोजन शिजवण्यासाठी शाळेत आल्या. आहार शिजवण्यासाठी गॅस सुरु केला. गॅसचा आवाज येऊ लागल्याने गॅस बंद करत असताना मोठा जाळ झाला. गायकवाड यांनी तातडीने बाहेर पडत आणि प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना शाळे बाहेर काढले.
दरम्यानच, गॅसचा मोठा स्फोट झाला. यात शेडचे पत्रे दुरवर उडाले. मोठा स्फोट झाल्याने नागरीकांनी शाळेकडे धाव घेतली. आगीचे ज्वाळा सुरु असताना नागरीकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी न होता आग आटोक्यात आली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते, सरपंच लक्ष्मी ताई पाटील, माजी चेअरमन सुनिल पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड व एजाज देसाई यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
स्वप्नाली गायकवाड यांनी आग लागल्याचे दिसताच विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातून बाहेर काढले. परिणामी कोणालाही इजा झाली नाही. ती माऊली धावली अन चिमुकली वाचली अशी चर्चा सुरु होती.