सांगली : निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, दोन मित्रांच्या गाड्याही जप्त ; कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

0
4

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली लोकसभेसाठी कोण निवडून येणार यावर लावलेली पैज दोन मित्रांच्या अंगलट आली आहे. पैज लावणाऱ्या दोघांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रमेश जाधव आणि गौस मुलाणी, असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील हे निवडून येतील तर शिरढोणचे गौस मुलाणी यांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून येतील अशी पैज लावली होती. पैजेचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरलही केला होता. मात्र कवठेमहांकाळ पोलिसांनी या पैजेची गंभीर दखल घेत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी बोरगाव, शिरढोण येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्या. विशाल पाटील निवडून आले तर रमेश जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी (क्रमांक एमएच-10-डीएच- 8800) गौस मुलाणी यांना देण्यात येईल. तर संजयकाका पाटील निवडून आले तर मुलाणी यांच्याकडून बुलेट गाडी (क्रमांक एमएच-10-डीएफ-1126) जाधव यांना देण्याची पैज जाहीर केली होती.