अलमट्टी धरणातून सध्या 80 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळं सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झाला आहे.चांगल्या पावसामुळं अलमट्टी धरण सध्या 80 टक्के भरले आहे. अद्यापही पाऊस सुरुच आहे.कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकार दोघांनी समन्वय राखून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. दोन्ही नद्या आता पात्राबाहेर पडल्या आहेत.कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे.सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरु असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.