sangali : मिरजेत पूर्ववैमनस्यातून गटात हाणामारी; गावठी पिस्तुलातून गोळीबार, शहरात तणावाचे वातावरण

0
128

माणदेश एस्क्प्रेस न्यूज|मिरज : मंगळवार पेठेतील चर्चजवळ बुधवारी दुपारी जुन्या वादातून दोन तरुणांच्या गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेदरम्यान गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली आणि वैभव यादव यांच्या सलून दुकानाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, वडर गल्लीतून सुरू असलेल्या जुन्या वैमनस्याचे पडसाद चर्चजवळ उमटले. यादव यांच्या सलून दुकानाबाहेर दोन्ही गटांनी एकमेकांवर काठ्यांनी हल्ला चढवला. यावेळी एका आरोपीने रस्त्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रणील गिलडा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले रिकामे काडतूस जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. मिरजसह परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपी गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here