‘अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा वाटा आहे’; छगन भुजबळांचा खळबळनजक दावा

0
213

अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार केला. यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार  आणि स्थानिक आमदार राजेश टोपे  हे अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी आले आणि त्यांनी मनोज जरांगे  यांना पुन्हा त्याठिकाणी बसवले, असा दावा अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला. ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माझ्या माहितीप्रमाणे अंतरवालीत ज्यावेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीमार झाला तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. परंतु, रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले. यानंतर तिकडे शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे हेदेखील तिकडे गेले. पवार आणि उद्धव साहेबांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती. आंदोलकांच्या दगडफेकीत 80 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी अंतरवाली सराटीत स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला, हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहिती नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले.

मात्र, रोहित पवार आणि राजेश टोपे हे दोन्ही नेते अंतरवाली सराटीत आल्याने काय घडलं तर प्रसारमाध्यमांसमोर या प्रकरणातील एकच बाजू समोर आली. याचा फायदा पुढे मनोज जरांगे पाटील यांना झाला. मात्र, अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा वाटा आहे, असे तेथील लोक सांगत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. भुजबळांच्या या आरोपांवर आता रोहित पवार आणि राजेश टोपे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here