बुलढाण्यात सिंदखेडराजा येथे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी सभोवताली सुरू असलेल्या उत्खननात शिव मंदिराचे अवशेष आढळले आहेत. यामुळे शहरातील सिंदखेडराजा येथे ऐतिहासिक स्थळांमध्ये भर पडली आहे.
सिंदखेडराजा येथे ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. याच दरम्यान १९ मे रोजी तेथे यादवकालीन शिवमंदिराचे अवशेष सापडले आहेत. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांतर्गत काही दिवसांपासून खोदकाम सुरू आहे.
या दरम्यान समाधीच्या चौथऱ्यापासून पाच फूट खोल व समाधी मंदिरापासून साधारण २० फूट अंतरावर मोठे शिवलिंग आढळून आले. शिवलिंगाच्या बाजूला दर्शनी भागात सुबक नक्षीकाम असलेली चौकट मिळून आली.शहरातील काही ऐतिहासिक ठिकाणे राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे तेथे उत्खननाचे काम सुरू आहे.