मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेला फार मोठा धक्का बसला. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसेचा एकमेव आमदार असलेले राजू पाटील हेही पराभूत झाले. यानंतर आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मनसैनिकांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा नशीब आजमावत होते. परंतु परिणामी माहीममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली. याचा फायदा ठाकरे गटाला झाला आणि महेश सावंत निवडून आले. मनसेच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे अद्यापही समोर आलेले नाहीत.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत झाली. विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले असून, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार आहे.