पुणे विभागीय आयुक्तांनी घेतला सांगली जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा

0
10

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : टंचाई परिस्थिती उद्भवलेल्या भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीत दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले, जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठा व उपसा सिंचन योजना मधील पाण्याचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून उपलब्ध पाण्याचे स्त्रोत निश्चित करावेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरणाद्वरे जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती माहिती दिली. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९८ टँकर सुरू असून यामध्ये जत तालुक्यात 86, आटपाडी 11 आणि एक टँकर शिराळा तालुक्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासन निकषानुसार दुष्काळ परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या आठ उपाय योजना लागू करण्यात आल्याची माहिती देवून जिल्ह्यात सद्यस्थितीत आवश्यक चारा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.