लोकप्रिय बॉलीवूड कपल रितेश-जिनिलियाने घेतला आयुष्यातील मोठा निर्णय; म्हणाले…

0
485

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा-देशमुख ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला 12 वर्षे झाली असून त्यांना दोन मुलं आहेत. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर या दोघांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल ते गेल्या बऱ्याच काळापासून विचार करत होते. अखेर त्यांनी हा निर्णय घेतला असून नुकतीच त्याची घोषणा केली आहे. रितेश आणि जिनिलिया यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

रितेश आणि जिनिलिया हे गेल्या बऱ्याच काळापासून अवयवदानाचा विचार करत होते. आता नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (NOTTO) व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे NOTTO ने रितेश आणि जिनिलियाचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया हे या गोष्टीला अत्यंत सुंदर भेट असल्याचं सांगत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी चाहत्यांनाही अवयवदान करण्याचं आवाहन केलं आहे.

 

या व्हिडीओमध्ये रितेश म्हणाला, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही दोघांनी अवयवदान केलं आहे.” तर जिनिलिया सांगते, “होय, आम्ही आमचं अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे आणि ही आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर भेट आहे. यापेक्षा चांगली भेट अजून काही असूच शकत नाही.” रितेश आणि जिनिलियाप्रमाणेच याआधी इतर सेलिब्रिटींनीही अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीने 2022 मध्ये हा निर्णय घेतला होता. जुईने हृदय, आतडे, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि डोळे दान करण्याचं वचन दिलं आहे. त्यापूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही नेत्रदान केल्याची माहिती दिली होती. रितेश आणि जिनिलियाच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून अवयवदानाबद्दल जागरुकता निर्माण केली होती. अवयवदानामुळे मृत्यूनंतर तुम्ही आठ-नऊ लोकांचे प्राण वाचवू शकता. तुम्ही तुमचं हृदय, यकृत, फुफ्फुसं हे अवयव दान करू शकता.