
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने एका शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे केले. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण कुणाल इथेच थांबला नाही. त्याने हा वाद सुरु असताना ‘हम होंगे कंगाल…’ हे आणखी एक गाणे प्रदर्शित केले. या प्रकरणी कामराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आता कुणाल कामराच्या शोला जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे.
मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराने ज्या शोमधून एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली त्या शोला उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांना समन्स बजावले आहेत. जे प्रेक्षक त्या दिवशी कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते त्यांचा पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने प्रेक्षकांची ओळख पटवून त्यांना जवाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसही पाठवली आहे. ज्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांना साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. पोलिसांना शोमधील एक किंवा दोन उपस्थितांना साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्याचा अधिकार आहे.
कुणालच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, “जे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी केलंय ना, बोलावं लागेल. याठिकाणी त्यांनी आधी काय केलं? आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. मग एनसीपीतून एनसीपी बाहेर आली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. सर्वजण कन्फ्युज झाले. चालू एकाने केलं, ते मुंबईत खूप मोठा जिल्हा आहे.. ठाणे.. तिथले आहेत,” तो असे विनोदी शैलीत बोलला. यानंतर तो शाहरुख खानच्या ‘भोली सी सुरत.. आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर स्वत: बनवलेलं गाणं गाऊ लागतो. एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने हे गाणं लिहिले.
कुणाल कामरा इथेच थांबला नाही. त्याने, ‘हम होंगे कंगाल, एक दिन मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश हम होंगे कंगाल, एक दिन होगे नंगे चारो और, करेंगे दंगे चारो ओर पोलिस के पंगे चारो ओर, एक दिन मन मै नत्थुराम, हरकते आसाराम हम होंगे कंगाल, एक दिन होगा गाय का प्रचार, लेके हाथो मे हत्थियार होगा संघ का शिष्टाचार, एक दिन जनता बेरोजगार, गरीबी की कागार हम होंगे कंगाल, एक दिन…’ हे दुसरे गाणेही प्रदर्शित केले. कुणाल कामराविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.