बैलगाडा शर्यतीत भाग घेताय?  पाळावा लागेल ‘हा’ नवा नियम

0
2

बैलगाडा शर्यत म्हणजे एकदम मातीतील खेळं. रांगड्या गड्यांनी खिल्लारी बैलाच्या मशागतीने दम दाखवला की मिळवलं. मातीशी नाळ घट्ट करणाऱ्या या खेळाला दृष्ट लागली होती. पण आता समदं कसं व्यवस्थित झालंय. पण एक अजून नियम आलाय बघा. त्याशिवाय काळ्या आईच्या लेकराला या शर्यतीत भाग घेता येणार नाही. बघ बीगी बीगी जाऊन इतकं एक काम केलं की झालं. बैलगाडा शर्यतीत करा की आनंदाची उधळण, दाखवा दम. कोणी अडवलंय तुम्हाला. पण हा एक नियम जरुर पाळा. सर्जा-राजासाठी इतकं काम करावं लागतंय बघा.

 

बैलगाडा शर्यतीसाठी महत्त्वाची बातमी आहे. कानाला बिल्ला नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही. टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ईअर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्री ही करता येणार नाही. 1 जून पासून एअर टॅग बंधनकारक असल्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे.

 

तर केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ‘नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन‘ही भारत पशुधन प्रणाली आणली आहे. या प्रणालीनुसार जनावराच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो. त्यात एक 12 अंकी बारकोड असतो. यामध्ये पशुची जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यात येते. रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण याची नोंद ठेवण्यात येते. पशुधनाचे प्रजनन, त्याचा मालक, जन्म-मृत्यू, आजार, त्यावर केलेले उपचार आदींची माहिती ठेवण्यात येते. म्हणजे जनावराची समंदी हिस्ट्रीच जमा करण्यात येते म्हणा की, एखाद्यावेळी जनावर आजारी पडलं तर आपल्याला यापूर्वी हा रोग त्याला कधी झाला होता, हे कळतं.

इअर टॅग एक बारकोड पद्धती आहे, जी सॉफ्टवेअर मध्ये डेव्हलप केलेली आहे. त्याची नोंद भारत सरकारकडे असते. बाजार समिती, आठवडी बाजार खरेदी विक्री संघ, यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना हा इअर टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावे लागणार आहे. नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी, असा शासन आदेश आला आहे. तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इअर टॅगिंग जरुर करुन घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here