महापालिका शाळेतील मुलांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी सांगलीत कृती कार्यक्रमचे आयोजन

0
123


सांगली : महापालिका शाळेतील सव्वापाच हजार मुलांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने ९० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला असून, भाषा व गणित विषयासाठी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

 

महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत आहे. या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ताही कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मागे राहणारे विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची सूचना केली.

 

विद्यार्थ्यांमध्ये गणित व भाषा विषयक जाणीव कमी असल्याचे पडताळणीत आढळून आल्याने या विषयावरच भर देण्यात आला आहे. अभ्यासात प्रगती न दिसणारे विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष देऊन त्यांची अध्ययनात प्रगती करवून घेण्यात येत आहे. यासाठी शिक्षकांकडून जाणीवपूर्वक अध्ययन केले जात आहे.

 

महापालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा व सर्वांगीण विकास करून एनईपी २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे, अध्ययनस्तर वाढविण्यासाठी प्रोजेक्ट समय हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 

इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुलांची पूर्व चाचणी ऑगस्टमध्ये घेण्यात आली. यामधून विद्यार्थ्यांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती उपलब्ध करून घेण्यात आली होती. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करण्याबाबत महापालिका शिक्षण विभाग व डाएट सांगली, केंद्रसमन्वयक व अनुभवी शिक्षक यांच्याशी चर्चा करून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.