आटपाडीचे प्राथमिक आरोग्य केंद्र, खादी भांडाराच्या जागेत आठवडा बाजार भरवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची मागणी

0
27

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीच्या चौफेर विकासासाठी आटपाडीचे दोन्ही ओढे नगरपंचायतच्या ताब्यात द्या, सध्याच्या एस.टी.स्टॅन्ड परिसरातच एस. टी. डेपो साकारा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खादी भांडाराच्या जागेत आठवडा बाजार भरवा. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आणि ओबीसीतील अल्पसंख्याक विभागाचे पुणे विभागीय अध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे.

आटपाडीच्या दोन्ही ओढ्यांची विस्तीर्ण पात्रे आटपाडी नगरपंचायतीच्या ताब्यात देवून अंबामाता मंदिराच्या पुढील ओढापात्रात नगरपंचायतीची भव्यदिव्य इमारत उभारावी ज्यामुळे ओढ्यातील अतिक्रमणांना आळा बसेल आणि या ओढापात्राचा सर्व सोयीनियुक्त प्रचंड बाजार पेठ साकारण्यास उपयोग होईल यादृष्टीने सर्वपक्षीय राजकर्ते व समाजघटक यांनी सकारात्मक विचार करावा.

आटपाडी एस. टी. स्टॅन्ड परिसरातच असलेल्या खादी भांडार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही एकर जागेच्या परिसरातील काही इमारती भाड्याने दिल्या गेल्या आहेत. याउपर या परिसरातले पूर्वीचे वैभव लुप्त झाले आहे. अनेक व्यवस्था बंद आहे. सदरच्या विस्तीर्ण परिसराचा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही एकर जागेचा उपयोग गावच्या विकासासाठी केला गेल्यास आटपाडीला आणखी समृद्धता येवू शकेल. आठवडा बाजारासह दैनिक बाजारासाठीही या जागांचा विचार केला पाहीजे. खादी भांडार परिसरात, राज्यभर प्रसिद्ध असणारा आटपाडीचा शेळ्या- मेंढ्या, बोकडे-बकऱ्यांचा आठवडा सुरू केल्यास हजारो शेतकरी, पशुपालक, व्यापारी, हेडे, व्यावसायीक, खाटीक यांच्यासाठी आणि मार्केट कमिटीसाठी ही मोठे सोयीचे ठिकाण होणार आहे.

खादी भांडारला लागून असलेल्या विस्तीर्ण ओढापात्राचा उपयोग शेकडो वाहनांच्या पार्कींगसाठी होवू शकतो. खादी भांडारातील मोठा विस्तीर्ण बंदिस्त परिसर शेळ्या मेंढ्याच्या प्रचंड बाजारासाठी मोठा सोयीचा ठरू शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशस्त जागेत भाजीपाला, धान्य, कडधान्ये, स्टेशनरी, कटलरी, किराणा, वगैरे सर्वप्रकारच्या वस्तू, पदार्थ विक्रीचा सर्व बाजार येथे साकारला जावू शकतो . ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी मोठ्या आच्छादनाच्या अनेक प्रशस्त लायणी (ओळी) मध्ये शेकडो व्यवसायीकांना या बाजारात सामावता येवू शकेल.

आटपाडी तलावापासून निघणारे आटपाडीचे दोन ओढे आटपाडीच्या बाजार पटांगणाजवळ एकत्र येतात. पाणी पुरवठा विहीर, साईबाबा मंदिराच्या मागून अंबामाता मंदिराजवळ वळसा घेणाऱ्या या दोन ओढ्यापैकी मुख्य ओढ्याची रुंदी ८० ते ९० मीटर रुंदी इतकी असून वळणाच्या ठिकाणी १२० मीटर विस्तीर्ण होणाऱ्या या ओढापात्रात प्रचंड प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. ओढ्यालगत संरक्षक तटाच्या प्रशस्त भिंतीच्या आतच शतकापासून घरेदारे असणाऱ्या अनेकांनी ७ – ८ फुट रुंदीच्या संरक्षक तटाच्या भिंती ओलांडून ओढापात्रात प्रचंड अतिक्रमण केले आहे. उच्चभ्रू लोकवस्तीतल्या अनेकांच्या आणि इतरही मान्यवर महोदयांच्या या अतिक्रमण प्रकारावर तहसील प्रशासन, नगरपंचायत आणि संबधीत अन्य शासकीय व्यवस्थांनी डोळे झाकून घेतल्याने शेकडो कोटी रुपये किंमतीच्या परिसराची अक्षरशः लुट सुरू आहे .

 

याला पायबंद घालण्यासाठी हे प्रचंड रुंदीचे दोन्ही ओढे दीड किमी परिसरापर्यंत नगरपंचायतीकडे सुपूर्द केले पाहीजेत, आणि गावच्या ओढ्यालगतच्या संरक्षक भिंतीला लागून पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून नगरपंचायतीची भव्य, दिव्य आणि प्रशस्त इमारत साकारली गेली पाहिजे. नगरपंचायतीचे सर्व विभाग या विस्तीर्ण जागेत साकरण्यासाठी सर्वांनीच उठाव केला पाहीजे. ओढ्यातील सर्व अतिक्रमणे काढून या दोन्ही ओढ्यांचा आटपाडीच्या विकासासाठी उपयोग केला पाहीजे.

आताचे एस.टी. स्टॅन्ड भविष्यात आटपाडी एस.टी. डेपो आवारात नेण्याचा अनेकांचा मानस वेळोवेळी व्यक्त झाला आहे. सदरचे एस.टी.स्टँड डेपो कडे हलविण्याबाबत अधून मधून आवई उठवली जाते. परंतू ही बाब अतिशय अव्यवहार्य आहे. आटपाडी शहरातील जवळपास ७५% जनतेच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरणार आहे. प्लॉटींगकर्त्यांच्या व्यवसायाला अच्छे दिन यावेत म्हणून अथवा केवळ व्यापारी, व्यवसायिक विचार न करता जनतेच्या सुखसोईचा पण विचार झाला पाहीजे.

 

सध्याचे एस.टी. स्टॅन्ड आटपाडी तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांना मोठे सोयीचे आहे. या स्टॅन्डवरून पंढरपूर, सातारा, अकलुज बारामती वगैरे गावाकडे जाणारी प्रत्येक बस सांगोला चौक, बाजार पटांगण, पोलीस स्टेशन चौकात थांबून तेथील प्रवाशांची ने – आण करीत असतेच, शिवाय एस.टी. डेपो परिसरातल्या सर्व भागातल्या रहिवाशांना अगदी नाममात्र रुपयाच्या तिकीटात डेपोतून स्टॅन्डकडे येणाऱ्या आणि स्टॅन्डवरून डेपोकडे, अथवा त्या मार्गे जाणाऱ्या एसटीतून ये- जा करता येते, या पार्श्वभूमीवर आताच्या एस.टी. स्टॅन्ड जवळच्या पाव – अर्धा किमी परिघातले अनेक शेतकरी, गुंठेवारीच्या माध्यमातून थोड्या थोड्या जागा विकत आहेत.

 

हे लक्षात घेत आताच्या एस टी स्टॅन्डच्या २५०-५०० मीटर परिघातल्या खाजगी जमिनींना, राष्ट्रीय महामार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनींना दिल्या जाणाऱ्या सर्वोच्य दराने रक्कम देत या जमीनी ताब्यात घेऊन शासनाने सध्याच्या एस.टी. स्टॅन्ड परिसरातच भव्य दिव्य एस.टी.स्टॅन्ड आणि प्रशस्त एस.टी. डेपो साकारल्यास हे सर्वोत्तम सोयीचे आणि न्यायाचे होणार आहे. एस.टी. महामंडळ आणि शासनाला ही नवीन व्यवस्था साकारण्यास काहीही अडचण येईल असे वाटत नाही. असेही सादिक खाटीक शेवटी म्हंटले आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here