पोर्श अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामिनावर सुटका… मृताची आई संतप्त

0
8

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पोर्श कार अपघाताप्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या ‘त्या’ अल्पवयीन आरोपीला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील जेलमध्ये आहेत. त्यामुळे अल्पवयीन तरुणाला आत्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे या घटनेत मृत्यू पावलेल्या अनिश अवधिया या तरूणाची आई मात्र खूप नाराज आहे.

न्यायाधीश आणि संपूर्ण यंत्रणा अल्पवयीन आरोपीच्या वेदना पाहू शकते, पण आमची वेदना का दिसत नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. या अपघातात जीव गमावणाऱा अनिश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तरण्याताठ्या मुलाच्या मृत्यूने त्याची आई खचून गेली आहे. न्यायालयाच्या या ( जामीनाच्या) निर्णयामुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. त्या अल्पवयीन आरोपीला फाशी व्हावी , अशी काही आमची इच्छा नाही. पण त्याला (कठोर) शिक्षा तर मिळालीच पाहिजे, की तो पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलं ?

अल्पवयीन आरोपीला 19 मे ला जामीन देताना बाल न्याय मंडळाने घातलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करावे लागणार, असं हायकोर्टाने आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध आणि वाहतुकीच्या नियमांचा 15 दिवसांचा अभ्यास करावाच लागणार आहे. या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. पहिल्यांदा जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्याचा ताबा आता त्याच्या आत्याकडे देण्यात यावा, असं कोर्टाने म्हटलं. मुंबई हायकोर्टाच्या या आदेशामुळे आता अल्पवयीन आरोपीची 33 दिवसांनी बालसुधारगृहातून सुटका होत आहे.

काय आहे पुणे अपघात प्रकरण ?

पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. याप्रकरणी त्याचे वडील , आजोबा, रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न करणारी त्याची आई, तसेच ससूनमधील डॉक्टर आणि एक कर्मचारी यासह अनेक जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरूंगाची हवा खात आहेत.

33 दिवसांनी मिळाला जामीन

या प्रकरणी लोकांकडून बरीच टीका झाल्यानंतर पोलिस आणि सरकारवर दबाव वाढला. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात होता तसतशा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपी अल्पवयीन दोन पबमध्ये गेला होता आणि 12वीची परीक्षा पास झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती. त्यासाठी त्यांनी 48 हजार रुपयांचे बिलही भरले होते. मद्यधुंद अवस्थेत तो पबमधून बाहेर पडताच त्याच्या वेगवान पोर्श कारने दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना चिरडून ठार केले. अपघातानंतर 33 दिवसांनी आरोपीची बालसुधारगृहातून जामीनावर सुटका करण्यात आली आहे.