बिहारचे सिंघम अशी ओळख असलेल्या मराठमोळ्या आयपीएसचा पोलीस सेवेतून राजीनामा

0
566

बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच (Bihar) राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

शिवदीप लांडे हे मध्यतरी मुंबईत महाराष्ट्र पोलिस सेवेतही कार्यरत होते. लांडे हे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते.

2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. शिवदीप लांडे यांची काही काळासाठी महाराष्ट्रात बदली झाली होती तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही खेद व्यक्त केला होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लांडे यांना सोडण्याची इच्छा नव्हती. मात्र, सिंघम शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजे महाराष्ट्रात परतायचे असल्याने त्यांना मुभा देण्यात आली होती.

कोण आहेत शिवदीप लांडे?
शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी शिक्षण घेतलं आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथं शिवदीप यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. शिवदीप यांना एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहे. शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. यानंतर शिवदीप यांनी नोकरीनिमित्त थेट मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. मात्र समाजाप्रती काही करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी केली. यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं.

पहिली पोस्टिंग
शिवदीप लांडे यांची प्रशिणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून बिहारच्या मुंगेरजवळच्या जमालपूर इथं नियुक्ती झाली होती. हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जात होता. पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून या भागाला ओळखलं जात होतं. इथेच 2005 साली नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक सुरेंद्र बाबूंची हत्या केली होती. त्यामुळे पोलीस या ठिकाणी जाण्यास घाबरत होते. मात्र पहिल्याच नियुक्तीत शिवदीप यांनी आपल्या कामाची छाप पाडून, स्थानिकांचा विश्वास मिळवला. प्रत्येक आठवड्यात ते या परिसरात जाऊन स्थानिकांच्या गाठीभेटी घेत. त्यामुळे स्थानिकांचं त्यांना सहकार्य मिळालं. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यात झाली. शिवदीप यांनी बिहारमध्ये अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली. धडक कारवाई रोखण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला. त्यांची बदलीही करण्यात आली. मात्र, शिवदीप यांच्या बदलीविरोधात बिहारी जनता रस्त्यावर उतरली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here