मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली : अंतरवाली सराटी येथूनच विरोध

0
6

माणदेश एक्सप्रेस न्युज/जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशीच आपण पुन्हा एकदा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती. मात्र जरांगे पाटील यांच्या या निर्णयाला अंतरवाली सराटीतूनच विरोध झाला आणि उपसरपंचासह अन्य काही गावकऱ्यांनी जरांगे यांच्या उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचं सांगत जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. अशातच आता मनोज जरांगे यांनी उपोषणाबाबत महत्त्वाची घोषणा केली असून उद्या उपोषण न करता ८ जूनपासून उपोषण करण्यात येईल, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

 

काही फितूर लोकांनी केलेल्या विरोधामुळे मी उपोषण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नसून आचारसंहितेच्या नावाखाली मराठा समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण मनोज जरांगे यांनी दिलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, यासाठी शासनाच्या स्तरावर काही पुढाकार घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाचा ४ जून रोजी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. हे आंदोलन भरकटत चालले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांसोबत बोलत नाहीत, असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे.