माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल केला असून आज १ सप्टेंबरपासून दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
१९ किलो व्यावसायिक LPG सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १,६९१.५० असेल. ही दरवाढ अनेक घसरणीनंतर होत आहे. याआधी काही महिने व्यवसायांना काहीसा दिलासा मिळाला होता. जुलैमध्ये प्रति सिलिंडरच्या किमती ३० रूपयांनी कमी झाल्या होत्या, त्याआधी जूनमध्ये ६९.५० आणि मे मध्ये १९ रूपयांची घट झाली होती. १ जूनच्या कपातीने किरकोळ किंमत १ हजार ६७६ खाली आणली होती.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीचे दर तेल ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून निश्चित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, कर धोरण आणि बाजारातील पुरवठा-मागणी यासारखे विविध घटक लक्षात घेऊन सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर बदलतात.