‘लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

0
140

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी (CM Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आगपाखड केली. दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नव्या संसदेतही पाणी शिरले होते. या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. नवी संसद आणि अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला एक वर्षच पूर्ण झाले आहे. तरीही याठिकाणी पावसाळ्यात पाणी गळत आहे. त्यामुळे या दोन्ही कामांसाठी भाजप सरकारने ठेकेदरांना किती पैसे दिले, या सगळ्यातून कमिशन कोणाला मिळालं? याची चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराचं काम लार्सन अँड टुब्रो आणि दिल्लीतील नव्या संसदेचं काम टाटांनी केले. पण या कामाची इतर कंत्राटं कोणाला देण्यात आली होती, याची चौकशी झाली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

लाडक्या बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे अडकले
लाडकी बहीण योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नव्या कामाला निधी देऊ नका, अशा सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील दीड कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा पहिला हप्ता महिलांना दिला जाणार आहे. तोपर्यंत सरकारी कंत्राटदारांची देयके अदा केली जाणार नाहीत. कंत्राटदारांच्या बिलाच्या सर्व फाईल्स रोखून ठेवण्यात आल्या आहेत. लाडक्या बहि‍णींना ओवाळणी दिल्यानंतरच सरकार या कंत्राटदारांचे पैसे देणार आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here