लोकसभा निवडणुक संपताच राज्यात राजकीय वातावरण निवळलं नाही तोपर्यंत पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढले आहे. हपसरमधील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांनी रविवारी रात्री नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय, काही वाहनांची तोडफोड केली. हातात कोयते घेऊन ते हवेत भिरकावले. नागरिकांना धमक्या दिल्या. घरात घुसून बेदम मारहाण केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
कोयता गँगच्या गुंडांकडून झालेल्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेत लक्ष घालून लवकरात लवकर गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुण्याला जेव्हा नवे पोलीस आयुक्त मिळाले होते. तेव्हा त्यांनी सर्व गुंडांना दहशत पसरवण्यावर आळा घालण्याची ताकीद दिली होती. हातात कोयते घेऊन रस्त्यावर धुमाकूळ काढणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली होती. त्याचे काय झाले असा रोष नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्याशिवाय, लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबवत कोयता गँगच्या गुंडांचा चांगलाच बंदोबस्त केला होता.
रविवारी रात्रीच्या सुमारास रामटेकडी परिसरात टोळक्याने दहशत माजवली. सात ते आठ मुलांच्या टोळक्याने दहा ते बारा गाड्यांचं नुकसान केलं. त्यांनी घरात घुसून नागरिकांवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत काहीजण जखमी झाले. इतक्यावरच न थांबता या गुंडांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली.