जाणून घ्या विजय परेडमध्ये काय-काय घडलं?काय म्हणाले रोहित आणि कोहली?

0
74

गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे  मुंबईत  जंगी स्वागत करण्यात आले. तेथून, संघ एका बसमध्ये चढला आणि मरीन ड्राईव्हला पोहोचला, जिथे विश्वविजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी हजारोंचा जमाव आधीच उपस्थित होता. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान, विराट कोहलीने  भारताच्या ऐतिहासिक विजयाचे बरेच श्रेय जसप्रीत बुमराहला  दिले. दुसरीकडे रोहित शर्माने  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यासोबतची भेट संस्मरणीय असल्याचे सांगितले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्यावर हा संपूर्ण कार्यक्रम संपला.

कोण काय म्हणाले?

रोहित शर्मा – ही ट्रॉफी आमची नसून सर्व देशवासियांची आहे. सकाळी पंतप्रधान मोदींना भेटून खूप सन्मान झाला आणि त्यांच्यात खेळाबद्दल खूप उत्साह आहे. जेव्हा डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या चेंडूवर शाॅट मारला तेव्हा मला वाटले की वाऱ्यामुळे षटकार जाईल, पण हे सर्व नशिबात लिहिले आहे. शेवटी सूर्यकुमार यादवचा झेल अविश्वसनीय होता. मला या संपूर्ण टीमचा अभिमान आहे.

विराट कोहली – रोहित शर्मा आणि मी खूप दिवसांपासून ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे स्वप्न नेहमीच विश्वचषक जिंकण्याचे होते. गेली 15 वर्षे आम्ही एकत्र खेळत आहोत आणि रोहितला इतका भावूक झालेला मी पहिल्यांदाच पाहिला आहे. तो रडत होता, मी रडत होतो, आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज दररोज जन्माला येत नाही आणि तो जगातील आठवे आश्चर्य आहे.

राहुल द्रविड – लोकांच्या या प्रेमाची मला खूप आठवण येईल. आज मी रस्त्यावर पाहिलेले दृश्य मी कधीही विसरणार नाही.

जसप्रीत बुमराह – आज मी जे काही पाहिलं, मी याआधी असं काही पाहिलं नव्हतं. मला सध्या निवृत्ती घेण्याची इच्छा नाही. माझी निवृत्ती अजून दूर आहे, ही फक्त सुरुवात आहे.

मरीन ड्राइव्हवर टीम इंडियाचे जंगी स्वागत

टीम इंडिया मुंबई विमानतळावरून मरीन ड्राईव्हवर पोहोचली की, लोकांची गर्दी पाहून कोणीही थक्क व्हायला होतं. वानखेडे स्टेडियमच्या वाटेवरचे दृश्य असे होते की, एका बाजूला पाण्याचा समुद्र तर दुसरीकडे मैदानावर गर्दीचा महापूर. मरीन ड्राईव्हवर हजारो लोक जमले होते. या गर्दीतून जाणाऱ्या निळ्या रंगाच्या खुल्या बसमध्ये टीम इंडिया चढली आणि सर्व चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रोहित शर्माचे कुटुंबीयही वानखेडे स्टेडियमवर पोहोचले.

टीम इंडिया बार्बाडोसहून सकाळीच दिल्लीला पोहोचले

‘बेरील’ नावाच्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया अनेक दिवस बार्बाडोसमध्ये अडकली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघ आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती. 16 तासांच्या प्रवासानंतर भारतीय संघ अखेर गुरुवारी सकाळी दिल्लीच्या विमानतळावर उतरला. त्यानंतर संघाची मौर्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत नाश्ता केला. पंतप्रधान मोदींसोबत सर्व खेळाडूंचे फोटोशूटही झाले.

पाहा व्हिडिओ: