मल्याळम चित्रपटसृष्टीही उत्तमोत्तम आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. पण सध्या हीच चित्रपटसृष्टी अत्यंत वाईट कारणामुळे चर्चेत आहे. न्या. हेमा समितीच्या अहवालाने ‘मॉलिवूड’मधील सरंजामी मनोवृत्ती चव्हाट्यावर आणली आहे. एका अभिनेत्रीचा विनयभंग आणि अपहरण केल्याप्रकरणी 2017 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालात मल्याळम चित्रपटसृष्टीविषयी बरेच धक्कादायक खुलासे करण्यात आले. काहींचे लैंगिक शोषण, काहींशी छेडछाड तर काहींवर बलात्कार झाल्याचंही त्यात म्हटलंय. हेमा समितीच्या अहवालानंतर अनेक अभिनेत्री समोर येऊन लैंगिक गैरवर्तणुकीबद्दल खुलासे करत आहेत. अभिनेता आणि सीपीआय(एम) आमदार मुकेश याच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्याने पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मुकेशच्या पहिल्या पत्नीचा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. अभिनेत्री आणि मुकेशची पहिली पत्नी सरिताने काही वर्षांपूर्वी त्याच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते.
जवळपास दशकभरापूर्वी सरिताने मुकेशवर गंभीर आरोप केले होते. “मी जे अनुभवलंय ते सांगतानाही मला लाज वाटतेय. माझ्यासोबत जे घडत होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी चित्रपटांमध्ये काम केलंय. हे सर्व मी चित्रपटांमध्ये घडताना पाहिलंय. पण माझ्यासोबत खऱ्या आयुष्यात असं काही घडेल मला वाटलं नव्हतं”, असं तिने म्हटलं होतं.
अभिनेत्रीकडून गंभीर आरोप
मुकेशच्या विवाहबाह्य संबंधामुळेच विभक्त झाल्याचं तिने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे त्याने अनेकदा कौटुंबिक हिंसाचार केल्याचाही आरोप सरिताने केला. याविषयी ती पुढे म्हणाली, “मी पुढे येऊन बोलायला घाबरत होते. मीडियामध्ये जेव्हा आमच्या नात्याविषयी चर्चा होत होत्या, तेव्हा आम्ही फक्त सर्वांसमोर सोबत असल्याचं भासवलं होतं. पण त्यादरम्यान त्याचे अनेकींसोबत अफेअर सुरू होते. त्याला त्याची चूक कळेल असं मला वाटत होतं. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी मुकेशच्या वडिलांनाच माझे वडील मानत होती. त्यांच्यामुळे मी पोलिसांकडे जाऊन तक्रार केली नाही. त्यांच्या निधनापर्यंत मी कुठेच काही बोलले नव्हते. जेव्हा मुकेशने मला त्याच्या नोकरांसमोर मारलं, तेव्हापासून मी त्याच्या घरी जाणं बंद केलं. माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढला गेला.” मुकेशचे वडील ओ. माधवन हे थिएटर दिग्दर्शक आणि अभिनेते होते. केरळमधील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. मुकेशची आई विजयकुमारी नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री होती.
“गरोदर असताना पोटावर मारली लाथ”
“मी गरोदर असताना त्याने माझ्या पोटावर लाथ मारली आणि त्यानंतर मी खाली पडले. त्यावेळी मी खूप रडले होते. अशा परिस्थितीत तो मला म्हणायचा की, ‘अरे वाह.. तू खूप चांगली अभिनेत्री आहेस. आणखी रड.’ मी नऊ महिन्यांची गरोदर असताना आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. तिथून परत येताना मी कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा तो मुद्दाम कार मागे-पुढे चालवत होता. त्या कारमागे धावताना मी खाली पडले आणि तिथेच रडत बसले. एके रात्री तो दारू पिऊन खूप उशिरा घरी आला होता. मी त्याला सहज विचारलं होतं की इतका उशीर का झाला? ते ऐकून त्याने माझे केस ओढले आणि मला खेचत नेलं. त्याने माझ्यावर हात उचलला होता”, असाही धक्कादायक खुलासा सरिताने केला होता.