शरीरातील लोहाचे प्रमाण कमी आहे ? ‘हे’ पदार्थ नक्की खा!

0
163

लाल-काळ्या वर्णाचे खाद्यपदार्थ लोह वाढवतात, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते, त्यात कितपत तथ्य आहे?शरीरामधील एखाद्या धातुघटकाशी निसर्गातील एखाद्या पदार्थाचे साम्य असेल तर तो पदार्थ तो शरीरघटक वाढवण्यास उपयुक्त होऊ शकतो, असा तर्क आपल्या पुर्वजांनी केला. त्यानुसार रक्त हे लाल वा लालसर-काळ्या रंगाचे आहे, म्हणून निसर्गातील जो-जो घटक लाल रंगाचा किंवा लालसर, काळसर वा तपकिरी रंगाचा असेल तो रक्तवर्धक होईल, असा अनुमान प्रमाणावर आधारित निष्कर्ष प्राचीन काळामध्ये पुर्वजांनी काढला.

या निष्कर्षानुसार लालसर-काळ्या पानांची माठाची भाजी, काळसर रंगाची पिकलेली करवंदे, काळ्या मनुका, लालसर अहळीव (हलीम), काळ्या रंगाचे कारळे, काळे तीळ, काळसर तपकिरी रंगाचे खजूर, लालसर तपकिरी रंगाची तांदळाची तुसे, तांबूस रंगाचे आमचूर चूर्ण, लाल चणे, पांढर्या,-काळ्या रंगाची चवळी, लालसर काळ्या रंगाची अळूची पाने, तांबूस रंगाचा कमळकंद, तपकिरी रंगाचा अळूचा कंद, तपकिरी काळसर रंगाचे केळफूल, गडद काळ्या रंगाची पिंपळी वगैरे पदार्थ रक्तवर्धक आहेत. विशेष गोष्ट ही की, हा तर्क प्रत्यक्षातही शरीरामधील लोह व पर्यायाने रक्त वाढवणारा आहे. म्हणजे असे की वर सांगितलेल्या सर्वच अन्नघटकांमध्ये लोह(आयर्न) हे तत्त्व मुबलक प्रमाणात असते; करवंदांपासून लालमाठापर्यंत आणि अहळीवापासून आमचूरापर्यंत सर्वच लाल-काळ्या रंगाचे पदार्थ हे रक्तवर्धक असतात, कारण त्यांच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.

या पदार्थांमध्ये नेमके किती प्रमाणात लोह मिळते, हे जाणून घ्यायला वाचकांना खचितच आवडेल. (पुढे १०० ग्रॅम पदार्थामधील लोहाचे प्रमाण मिलिग्रॅममध्ये दिले आहे. लोहाची दिवसाची गरज : सरासरी ३० मिलिग्रॅम)तांदळाची तुसे: ३५, चण्याची पाने: २३.८, लाल चणे( भाजलेले): ९.५, अळूची पाने : १०, चवळीची पाने : २०, माठाची पाने : ३८.५, बीट : १.१९, गाजर : १.०३, करवंदे(सुकी) : ३९, खजूर(सुके) : ७.३, कमळाचे देठ : ६०.६, अहळीव-दाणे, : १००,कारळे-बिया : ५६.७, आमचूर पावडर : ४५.२, पिंपळी : ६२, वरील बहुतेक पदार्थ हे लालसर-तांबुस किंवा काळसर रंगाचे आहेत.

वाचकहो, नीट निरिक्षण देऊन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की, ज्या गाजर-बीटचा रक्तवर्धनासाठी उत्तम म्हणून फार प्रचार केला जातो, त्या तुलनेत अस्सल भारतीय खाद्यपदार्थ कितीतरी अधिक प्रमाणात शरीराला लोह पुरवतात. बीटमधून अल्प प्रमाणात लोह मिळते, नाही असे नाही. मात्र जी फळे व भाज्या अस्सल देशी आहेत, याच मातीतील आहेत, ती आपल्या शरीरासाठी अधिक सात्म्य असणार, नाही का? तेव्हा रक्त वाढवण्यासाठी या काळ्या-लालसर वर्णाच्या आहाराचे सेवन करा . रक्त वा हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी ज्या गोळ्या-कॅप्स्युल्स वगैरेचे तुम्ही सेवन करता ते अनेकांना मलावरोधास व मळमळ होण्यास कारणीभूत होते, तसे या नैसर्गिक पदार्थांबाबत होत नाही. गोळ्या-कॅप्स्युल्सचे अतिसेवन त्रासदायक होऊ शकते, मात्र या पदार्थांचे अतिसेवन झाले तरी त्यांचा शरीराला धोका होणार नाही. जो-जो खाद्यपदार्थ रक्त वा कृष्णवर्णीय असतो, तो-तो रक्तवर्धक असतो; हा आपल्या प्राचीन पुर्वजांचा निरिक्षणावर आधारित अनुमानजन्य निष्कर्ष वास्तवातही सत्त्य आहे, हे इथे लक्षात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here