प्रवाशांची वाढती मागणी पाहता गतवर्षीच्या तुलनेत बसच्या संख्येत वाढ

0
166

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लालपरी चाकरमान्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने मुंबईहून कोकणात 4,300 जादा बसेस पाठवल्या आहेत. सध्या, यापैकी 75% बस सणाच्या अवघ्या 10 दिवस अगोदर पूर्ण बुक झालेल्या आहेत. 26 जुलै रोजी बस बुकिंग सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे 3,196 सीट बुक झाले आहेत. ज्यात 2,439 ग्रुप बुकिंगचा समावेश आहे.

बृहन्मुंबई ते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नेहमीच्या बसेस व्यतिरिक्त, एसटी महामंडळाने या वर्षी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी पाहता गतवर्षीच्या तुलनेत बसची संख्या वाढवण्यात आली आहे. या जादा बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून 2 सप्टेंबरपासून सुरू होतील.

दरम्यान, 3 ते 7 सप्टेंबरपर्यंत एसटीचे कर्मचारी बसस्थानक आणि स्टँडवर सुरळीतपणे काम करण्यासाठी तैनात राहणार आहेत. कोकणातील महामार्गालगत वाहन दुरुस्ती पथके स्थापन केली जाणार आहेत. तथापी, गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईहून 202 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईसह उपनगरातील लोक मोठ्या संख्येने कोकणात येतात. त्यामुळे या वर्षी मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 202 गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here