“मी होतो बाहेर, तुम्ही होताय का एकत्र?” प्रवीण दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा

0
6

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक वेगळ दृश्य पहायला मिळालं. मविआचे नेते उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. या दुश्यांवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांचा बाजार गरम झाला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला, त्यावेळी भाजपा नेते प्रवीण दरेकर सुद्धा तिथे होते. त्यांनी नेमकं तिथे काय घडलं? ते मीडियाशी बोलताना सांगितलं.

“राजकारणात सदासर्वकाळ कोणी कोणाचा शत्रू नसतो. मी लिफ्टमध्ये शिरत असताना सन्मानीय देवेंद्रजी आणि उद्धवजी त्या ठिकाणी आले. मिलिंद नार्वेकरही सोबत होते. त्यावेळी कोणीतरी म्हटल आपण दोघांना एकत्रित पाहून बरं वाटतं, त्यावर उद्धवजी लगेच म्हणाले, याला आधी बाहेर काढा. त्यावर मी म्हटलं, तुमच अजून समाधान झालेलं नाही. मी म्हटलं, मी होतो बाहेर, तुम्ही होताय का एकत्र? बोलता तसं करा. यावेळी थोडा हास्य विनोद झाला” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

‘लिफ्टमधून बाहेर पडल्यावर आमचे मार्ग वेगळे’

“लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर उद्धवजी विरोधी दिशेला गेला. आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात रहायची आहे. ते सत्तेच्या दिशेला आले नाहीत. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर आमचे मार्ग वेगळे झाले” असं सूचक विधान प्रवीण दरेकर यांनी केलं.

‘राज्यात आमची सत्ता येईल हा आम्हाला विश्वास’

हे बाय, बाय अधिवेशन आहे, अशी विरोधी पक्ष टीका करतायत. त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले की, “सहानुभूती, दृष्टीकोन या आधारावर छोटा यशाचा फुगा मिळालाय तो लवकरच फुटेल. जनतेच्या हिताचे क्रांतीकारी निर्णय घेऊन विधानसभा ताकदीने जिंकू. महायुतीचा झेंडा पुन्हा फडकेल. राज्यात आमची सत्ता येईल हा आम्हाला विश्वास आहे” ‘हा महाराष्ट्राचा राजकीय संस्कार’

“आम्ही एकमेकाचे शत्रु नाहीत. राजकीय वैमनस्य असलं, तरी भेटल्यावर बोलतो, हा महाराष्ट्राचा राजकीय संस्कार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे नेते एकत्र भेटले तर गप्पा होतात, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही” असं प्रवीण दरेकर म्हणाले.