“मी गाडी चालवत होतो, पण मी मद्यपान केले नव्हते” ; वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहीरचा दावा

0
63

वरळी अपघातानंतर मी आणि कुटुंबीय घाबरलो होतो. त्यामुळे मी पळालो. अपघातावेळी मी मोटरगाडी चालवत होतो, पण मी मद्यपान केले नव्हते, असा दावा आरोपी मिहीर शहाने पोलीस चौकशीत केला आहे. दरम्यान मिहीरने मद्यपान केले नसल्याच्या माहितीवर पोलिसांचा विश्वास नसून त्याबाबत पोलीस पुरावे गोळा करत आहेत.

मिहीर शाहला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अपघातानंतर कुटुंबावर हल्ला होईल या भीतीने आम्ही घर सोडले, असे मिहीरने चौकशीदरम्यान सांगितले आहे. अपघातानंतर मिहीरचे पालघरमधील आजी-आजोबाही घर सोडून गेले होते. तेथे वरळी पोलिसांचे पथक पोहोचले त्यावेळी मिहीरचे आजी-आजोबा दोन दिवसांपासून बाहेर गेल्याचे पोलिसांना समजले. मिहीर याच्या मोटरगाडीची क्रमांक पाटी (नंबरप्लेट) कोणी हटवली याबाबत पोलीस तपास करत आहेत. याशिवाय आरोपी मिहिरने आपल्याकडे चालक परवाना असल्याचे सांगितले आहे. पण अद्याप कुटुंबियांनी त्याचा चालक परवाना पोलिसांना दिला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आली आहे.

 

मिहीरच्या कुटुंबियांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास पोलिसांनी सांगितले असून त्यांची गुरुवारीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी मिहीरची मोटरगाडी व चालक परवान्याबाबत परिवहन विभागाला पत्र लिहिले आहे. याप्रकरणी दुसरा आरोपी राजऋषी बिडावत याला घटनास्थळी नेऊन तपासणी करण्यात आली आहे. लवकरच आरोपी मिहीर व बिडावतला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणी मिहीरला बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी गाडीची नंबप्लेट कोणी काढली, आरोपीला पळण्यात कोणी मदत केली, याबाबत माहिती घेणे आवश्यक असल्याचे सांगून सरकारी वकील भारती भोसले व रविंद्र पाटील यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने मिहीरला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी या प्रकरणी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. राजेश शाह यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला तर आरोपीचा चालक राजऋषी बिडावत याला ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
आरोपी मिहीर शाह हा अपघातापूर्वी जुहूतील ग्लोबल टपास बारमध्ये दारू प्यायल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुहूतील तो बार बंद केला आहे.

ओळख लपवण्यासाठी दाढी आणि केस कापले
आरोपी मिहीर शहा हा त्याचे मित्र आणि कुटुंबियांसह शहापूर येथे एका रिसॉर्टमध्ये होते. मिहीरने ओळख लपवण्यासाठी दाढी व केस कापले होते. मित्र आणि त्याने स्वत: मोबाइल बंद ठेवल्यामुळे पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मिहीर हा त्याच्या मित्रांशी मोबाईलवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अवघ्या १५ मिनिटांत पुन्हा मोबाईल बंद करण्यात आला. हाच धागा पकडून पोलिसांनी मिहीरला ताब्यात घेतले. त्यावेळी मिहीरने ओळख लपवण्यासाठी दाढी व केस कापल्याचे निष्पन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here