
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पंढरपूर : “तुझ्या भेटीची लागली आस…” अशा ओढीनं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले विठ्ठलभक्त आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत दाखल झाले आहेत. शुक्रवारपासूनच पंढरपूर नगरीत भक्तांचा महापूर उसळला असून चंद्रभागा तीर, विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, वाळवंट परिसरात भक्तांची मांदियाळी जमली आहे.
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात वर्णन केलेल्या “चंद्रभागा तीरी” हे दृश्य अक्षरशः साकार झाल्याचे चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. लाखो वैष्णवांनी नवमीपासूनच चंद्रभागेच्या दोन्ही तीरांवर गर्दी केली आहे. रविवारी (६ जुलै) आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार असतानाच त्यापूर्वीच पंढरपूर नगरी भक्तांच्या जयजयकारांनी निनादली आहे.
चंद्रभागा स्नान आणि भाविकांचा उत्साह
पंढरपुरात दाखल झाल्यानंतर भाविक सर्वप्रथम चंद्रभागा नदीत स्नान करून पुंडलिक मंदिरात दर्शन घेत आहेत. त्यानंतर वाळवंटात कीर्तन, अभंग, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांना रंग चढला आहे. अनेक भाविक होडीने नदीपात्रातील विष्णू मंदिर गाठून जलपर्यटनाचा आनंदही घेत आहेत. वाळवंट परिसरात पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सुरु आहेत.
विठ्ठल मंदिर परिसरात प्रचंड गर्दी, व्यवस्थापनासाठी सज्जता
विठ्ठल मंदिर परिसरात सध्या प्रचंड गर्दी असून १२ नंबर पत्राशेडपासून रांग गोपाळपूरपलीकडे पोहोचली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, मोबाइल शौचालये, आणि सूचना फलक लावण्यात आले आहेत. भाविकांसाठी आरामशाळा व भोजन व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, पोलीस, होमगार्ड, स्वयंसेवक व सीसीटीव्ही प्रणालीच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू दिली गेलेली नाही. विशेषतः प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, वाळवंट परिसर, होड्या घाट परिसरात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
चंद्रभागा नदीतील पाणी नियंत्रित ठेवण्याचे नियोजन
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेसाठी चंद्रभागा नदी पात्रातील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. नदी पात्रातील पाणी कमी होऊन भक्तांना सहज स्नान करता यावे, यासाठी नियोजनपूर्वक पाणी नियंत्रण करण्यात आले.
भाविकांच्या मुखातून विठुरायाच्या जयघोषाने पंढरी निनादली
विठ्ठल मंदिर, पुंडलिक मंदिर, चंद्रभागा किनारा, वाळवंट आणि पंढरपूरच्या प्रत्येक वेशीवर “ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरि विठ्ठल” अशा जयघोषांनी वातावरण भक्तिमय झालं आहे. फड, दिंड्या, टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तीची लाट संपूर्ण पंढरी व्यापून टाकत आहे.