माणदेश एक्सप्रेस न्यूज : खानापूर : खानापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगत येणारा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचाच आमदार निवडून येण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले.
खानापूर तालुक्यातील जखीनवाडी येथे शिवसेनेचे माजी सरपंच आणि पॅनल प्रमुख तानाजीराव शिंदे, ज्ञानदेव शिंदे, उद्धव गुरव, हणमंत शिंदे, धनाजी शिंदे, मधुकर शिंदे, पिराजी शिकलगार, शिवाजी शिंदे, विपुल शिंदे या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, विटा शहर प्रभारी पंकज दबडे, सरपंच दाजी पवार, निलेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षात प्रवेश केला.यावेळी गावातील हजारो तरुण, वृद्ध, महिला उपस्थित होत्या.
यावेळी खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राजकीय समीकरणे जुळवत असताना गावगाड्यात आत्तापर्यंत आम्हाला विकासासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याची भावना व्यक्त केली.
तर आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचे नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेतून आलेले नेतृत्व असून त्यांनी गाव गड्यातील शेवटच्या घटकापर्यंत विकासची गंगा पोहोचवली आहे. याचबरोबर राजकीय हेवेदावे, जिरवजीरवी या सर्व गोष्टीला त्यांनी फाटा दिला असून सत्तेचा वापर हा लोक हितासाठी कसा करावा याचे उत्तम व आदर्श उदाहरण खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पडळकर बंधूनी निर्माण केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन विकासाची नवीन नांदी या मतदारसंघांमध्ये निर्माण केली आहे. पडळकर बंधूंच्या याच आपलेपणाच्या भावनेने प्रेरित होऊन आम्ही भाजपा पक्षामध्ये आमदार गोपीचंद पडळकर व ब्रम्हानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याची भावना पक्ष प्रवेश केलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ब्रम्हानंद पडळकर यांना आमदार करणारच असे पक्ष प्रवेशावेळी ठाम निर्धार केला.