पावसाच्या पाण्याने घरातील ओलसर झालेल्या भिंतींचे वॉटरप्रूफिंग कसे करावे ? करा ‘हे’ सोपे उपाय

0
17872

पावसाळा आपल्याबरोबर अनेक समस्या घेऊन येतो. पाऊस सुरु झाला की आधी घराची विशेष काळजी घ्यावी लागते नाही तर पावसाने घराचे मोठे नुकसान होते. पावसाळ्यात काहीवेळा घरातील भिंतींमध्ये पाणी झिरपू लागले, भिंतींमध्ये ओलसरपणा दिसू लागतो. अशाने भिंतींवरील रंग तर खराब होतोच शिवाय कालांतराने पाण्याने ठिसूळ झालेल्या भिंतीच्या पोपड्या पडू लागतात. अशाने पूर्ण घर खराब, अस्वच्छ दिसू लागते.

पावसाळ्यात घराच्या भिंतींमधील ओलसरपणा टाळण्यासाठी, वेळीच वॉटरप्रूफिंग करणे आवश्यक आहे. वॉटरप्रूफिंग हे जमिनीच्या खाली, छत, बाथरुम, किचन, बाल्कनी आणि बाहेरच्या भिंतींवर करणे आवश्यक आहे. यासह पाण्याचे पाइप भिंतीच्या आतून असतील तर त्या भिंतींवरही केले पाहिजे. पण हे वॉटरप्रूफिंग कसे करायचे याबद्दल जाणून घेऊ…

वॉटरप्रूफिंगचे आहेत दोन प्रकार
इंटिग्रल वॉटरप्रूफिंगमध्ये वॉटरप्रूफिंग कंपाऊंड सिमेंटमध्ये मिसळले जाते आणि प्लास्टरिंग आणि क्रॅक भरण्यासाठी वापरले जाते. तर बॅरियर वॉटरप्रूफिंगमध्ये, वॉटरप्रूफिंग कंपाऊंडचा वापर थेट भिंतींवर रंगविण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गरजेनुसार एक किंवा अधिक कोटिंग करू शकता.

वॉटरप्रूफिंग इंजेक्शनचा करा वापर
वॉटरप्रूफिंगच्या इतर पद्धती आहेत जसे की, छत किंवा भिंतीतील तडे भरण्यासाठी इंजेक्शन ग्रॉउटिंगचा वापर केला जातो. यामध्ये वॉटरप्रूफ केमिकल उच्च दाबाने भितींवरील भेगांमध्ये भरले जाते. दाबामुळे केमिकल आत खोलवर जाते आणि तडा पूर्णपणे भरली जाते. अशा स्थितीत भिंतींच्या ओलसरपणाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

पावसाळ्यात घरातच काय घराभोवतीही फिरणार नाहीत डास, कीटक अन् माश्या; करा फक्त ‘हे’ ५ सोपे उपाय

घर बांधल्यानंतरही करता येते वॉटरप्रूफिंग
घर बांधत असतानाच वॉटरप्रूफिंग केले पाहिजे, असा विचार तुम्ही करत असाल, तर त्याची अजिबात गरज नाही. ओलसरपणा टाळण्यासाठी वॉटरप्रूफिंग नंतर केले जाऊ शकते, या प्रक्रियेत भिंतीवरून जुना पेंट काढून टाकला जातो आणि वॉटरप्रूफिंग कंपाऊंड वापरला जातो. आता ते एकतर सिमेंटमध्ये मिसळून किंवा पेंटसारखे केले जाऊ शकते.

पेंटने भरल्या जाऊ शकतात भिंतींवरील भेगा
अनेकदा लोक भिंतींवरील भेगा भरण्यासाठी सिमेंटचा वापर करतात, पण त्यामुळे ओलसरपणाची समस्या सुटत नाही. त्यामुळे भिंतींवरील भेगा भरण्यासाठी वॉटरप्रूफिंग कंपाऊंडचा वापर करावा. तुम्ही ओलसरपणा टाळण्यासाठी बाहेरील भिंतींवर वॉटरप्रूफ पेंट देखील लावू शकता. हे पेंट प्लास्टिकसारखे आहे, त्याच्या मदतीने भेगा सहजपणे भरल्या जाऊ शकतात.

अशा प्रकारे खरेदी करा वॉटरप्रूफ पेंट
जर तुम्ही वॉटरप्रूफ पेंट विकत घेत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा जसे की, पेंटचा फैलाव २०० ते ६०० टक्क्यांच्या दरम्यान असावा. भिंतीतील भेगा भरण्याची क्षमता किमान २ मिमी असावी. तर पेंट सुकल्यानंतर भिंतीवरील पेंटची जाडी १८० मायक्रॉन ते २४० मायक्रॉन दरम्यान असणे आवश्यक आहे.