आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणी तुम्हाला बाळाची चाहूल लागते तो क्षण तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. सहाजिकच गरोदर स्त्रीसाठी गर्भारपणाचा काळ हा खासच असतो. एक नवा जीव आपल्यातून निर्माण होणार आहे ही भावना नाजूक असते. त्यात पहिल्यांदाच हा अनुभव घेणाऱ्या महिलांसाठी तर नऊ महिने काय करावे आणि काय करू नये असं होऊ शकतं.
स्वतःला प्रशिक्षित करा
बाळ होण्याचा निर्णय हा नवरा बायको दोघांचा असायला हवा. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा आई बाबा होणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी आधीच शिकून घेणं गरजेचं आहे. यासाठी आजकाल काही चाईल्ड बर्थ क्लासेस असतात ज्यामुळे तुम्हाला योग्य प्रशिक्षण मिळू शकते. प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या, बाळाच्या जन्मानंतर त्याला कसं हाताळावं याबाबत या क्लासेमध्ये योग्य मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे अशा क्लासेसमध्ये तुमच्या मनातील प्रश्न विचारून तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करून घेऊ शकता.
बर्थ प्लॅन तयार करा
गर्भधारणा ही नेहमी प्लॅनिंग करूनच करायला हवी. अचानक गर्भधारणा झाल्यास सर्व गोष्टींचे नियोजन बिघडू शकते. यासाठी योग्य प्लॅन करून गर्भधारणा झाल्यावर बाळाचा बर्थ प्लॅन तयार करा. जसं की आई बाबा दोघांनाही बाळ हवे आहे का, बाळाला जर मोठे भावंड असेल तर त्याला कसं हाताळणार, प्रेगनन्सीमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. प्रसूती नैसर्गिक हवी की सी सेक्शन, नोकरीबाबत कोणता निर्णय घ्यायचा आहे, बाळाच्या जन्मानंतर कसं नियोजन असेल, आईला असलेल्या आरोग्य समस्या या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य प्लॅनिग करा. ज्यामुळे तुमचे पुढील नऊ महिने त्रासदायक होणार नाहीत.यासाठी तुम्ही प्रेगनन्सी केअर टिप्स चा वापर करू शकता.
गरोदरपणात करावयाचं हेल्थ चेकअप
गर्भधारणा कन्फर्म झाल्यावर फर्स्ट स्टेप आहे त्वरीत योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं. कारण त्यामुळे तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य कसे आहे ते तुम्हाला समजू शकते. गर्भारपण तीन टप्प्यामध्ये असते पहिल्या महिन्यापासून तिसऱ्या महिन्यापर्यंतच्या काळाला पहिली तिमाही असं म्हणतात. चौथ्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापर्यंतच्या काळाला दुसरी तिमाही असं म्हणतात. तर सातव्या महिन्यापासून डिलिव्हरीच्या काळाला तिसरी तिमाही असं म्हणतात. पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये गरोदर महिलांची विशेष काळजी (Anc Mother Care in Marathi) घेण्याची गरज असते. यासाठीच संपूर्ण गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधोपचार आणि आवश्यक टेस्ट करणं खूप गरजेचं आहे.
गरोदरपणात गरजेच्या व्हिटॅमिन्स
गरोदरपणात तुम्हाला तुमच्या आणि बाळाच्या दोघांच्या पोषणाची योग्य काळजी घ्यावी लागते. प्रेगनन्सीमध्ये शरीराला पोषण मिळण्यासाठी जास्तीच्या व्हिटॅमिन्सची गरज असते. बऱ्याचदा आहारातून असे व्हिटॅमिन्स मिळताच असं नाही. जर व्हिटॅमिन्सचा अभाव झाला तर बाळाच्या वाढ आणि विकासावर त्याचा परिणाम होतो. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळीच व्हिटॅमिन्स घेण्यास सुरूवात करावी. ज्यामुळे तुम्ही हेल्दी बाळाला जन्म देऊ शकता.