
माणदेश एक्सप्रेस /मुंबई : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह २०२४ या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू ठरला आहे. इंग्लंडचा जो रुट, हॅरी ब्रूक आणि श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस या तगड्या फलंदाजांना ‘धोबीपछाड’ देत बुमराहनं पहिल्यांदा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार पटकवला आहे. हा पुरस्कार जिंकणारा तो भारताचा सहावा क्रिकेटर ठरलाय. याआधी राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, आर. अश्विन आणि विराट कोहली यांनी हा पुरस्कार पटकवला आहे.
भारताच्या जलदगती गोलंदाजानं मागील वर्षात जबरदस्त कामगिरी करत अनेक विक्रम मोडित काढून नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराहनं १३ कसोटी सामन्यात १४.९२ च्या सरासरीसह ३०.१६ च्या स्ट्राइक रेटनं ७१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करून तो वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटूंच्या यादीत नामांकित झाला होता.
बुमराहला या पुरस्काराच्या शर्यतीत तगडी टक्कर होती ती इंग्लंडच्या जो रुटची. त्याने १७ कसोटी सामन्यात ५५.५७ च्या सरासरीनं १५५६ धावा केल्या होत्या. यात ६ शतकांसह ५ अर्धशतकांचा समावेस होता. कसोटी कारकिर्दीत पाचव्यांदा जो रुटनं एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम करून दाखवला. पण बुमराहसमोर तो फिकाच ठरला.