
Natural remedies for hair loss : उन्हाळा आला की आंब्याचा सिझन आपल्याला उत्साहात आणतो. आंब्याचे फळ तर सर्वांनाच प्रिय असते, पण त्याच्या हिरव्या पानांचे सौंदर्यवर्धक गुणधर्म फारच थोड्या लोकांना माहिती असतात. विशेषतः केसांच्या समस्या जसे की केसगळती, कोरडेपणा, डोक्याच्या त्वचेतील जळजळ – यावर आंब्याच्या पानांचा वापर एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरतो, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.
आंब्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी घटक असतात. हे घटक डोक्याच्या त्वचेची स्वच्छता राखतात, केसांची वाढ सुधारतात आणि केसांच्या मुळांना बळकटी देतात. बाजारात मिळणाऱ्या रासायनिक उत्पादनांपेक्षा घरी तयार करता येणारे हे नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात.
केसांसाठी आंब्याच्या पानांचा वापर करण्याच्या ३ सोप्या पद्धती:
१. आंब्याच्या पानांचा हेअर मास्क:
१०-१५ ताजी पाने, १ कप पाणी, आणि १ टेबलस्पून खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊन मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावून ३०-४५ मिनिटे ठेवावी. आठवड्यातून दोनदा वापरल्यास केसगळती कमी होते आणि केस मऊ व चमकदार होतात.
२. आंब्याच्या पानांचे पाणी:
१५-२० पाने २-३ कप पाण्यात उकळा. थोडं थंड झाल्यावर हे पाणी केस धुतल्यानंतर शेवटी ओता. हे पाणी न धुऊ देता तसेच राहू द्या. यामुळे स्काल्पमध्ये ताजेपणा येतो आणि केस मजबूत होतात.
३. आंब्याच्या पानांचे तेल:
१०-१५ पाने अर्धा कप खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये उकळा. पाने काळी होईपर्यंत उकळा. थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवा. आठवड्यातून दोनदा याने डोक्याला हलकासा मसाज केल्यास केसांची वाढ होते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.
नैसर्गिक उपाय, रासायनिक उत्पादनांना पर्याय
आजकाल केसांच्या समस्यांवर त्वरित उपाय मिळावा म्हणून अनेकजण रासायनिक प्रॉडक्ट्स वापरतात. पण त्याचे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात. आंब्याच्या पानांपासून बनवलेले हे घरगुती उपाय केवळ सुरक्षित नाहीत तर पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहेत.