आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा : आमदार गोपीचंद पडळकर यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते “या” दिवशी होणार सन्मान

0
1948

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य, आटपाडी तालुक्याचे सुपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांना 2023 24 या सालाकरता संसदेचा “उत्कृष्ट संसदपटू” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपद मुर्म यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे .

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२३-२४ करिता महाराष्ट्र विधानपरिषदेच्या “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कारासाठी गोपीचंद पडळकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

 

कुटूंबातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य नागरिकांना राजकारणाच्या माध्यमातून न्याय देण्याच्या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात प्रस्थापित नेत्यांनी त्यांना खूप मोठा त्रास दिला. परंतु न डगमगता त्यांनी मोठ्या हिमतीने त्यावर मात करत संपूर्ण सांगली जिल्हाच नव्हे तर राज्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील आक्रमकता व समाजाप्रती असलेली जाण ओळखून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यांनी या संधीचे सोने करत विधानमंडळात समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज पर्यंत महसूल मध्ये महत्त्वाच्या पण उपेक्षित असलेल्या पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मानधनांमध्ये त्यांनी मोठी पगारवाढ करून घेतली. त्याचबरोबर मेंढपाळांना देखील त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करत चराई भत्ता देखील मंजूर करून घेतला. गावकुसा बाहेर राहणाऱ्या पालातील नागरिकांना देखील त्यांनी सन्मानाची वागणूक देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत, त्यांच्याबरोबर पालातील दिवाळी ही संकल्पना राबविली. त्यामुळे प्रथमच पालातील नागरिकांच्या घरी देखील दिवाळी अनुभवता आली. या सामाजिक कामाबरोबरच त्यांनी राजकारण करताना देखील विकासकाम करताना विकासकाम हे कायमस्वरूपी कसे उभे राहील याकडे लक्ष देत मतदारसंघांमध्ये आरोग्याच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्रे निर्माण केली.

 

विधानपरिषदेमध्ये त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणे, व व गावगाड्यातील नागरिकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्ना बाबत शासनाला दखल घ्यावी लागते. उत्कृष्ट संभाषण कौशल्य व प्रश्न मांडण्याची पोटतिडकीनेच आमदार पडळकर यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार गोपीचंद पडळकर यांची राजकीय वाटचाल अधिक बहरत गेली. भाजप पक्षाने विधानपरिषदेवर दिलेल्या संधीचे सोने आमदार पडळकर यांनी केले आहे.
आटपाडी तालुक्यासह संपुर्ण बहुजन समाजाच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.