
पुणे (प्रतिनिधी) – “श्रीमंत बाजीराव पेशवे हे भारताच्या सैनिकी इतिहासातील एक अजरामर सेनानी होते. त्यांच्या स्मारकासाठी सर्वोत्तम जागा ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आहे,” असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. खडकवासला येथील एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून, त्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
शिवाजी महाराज, सावरकर आणि बाजीरावांचा गौरव
“मी पुण्याच्या भूमीत उभा आहे, जिथे हिंदवी स्वराज्याची पहाट झाली. ही भूमी म्हणजे स्वराज्याच्या संस्कारांचं उगमस्थान आहे,” असे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला.
ते पुढे म्हणाले, “सावरकरांनी एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो, याचं मूर्त उदाहरण दिलं. इंग्रजांना हे माहीत नव्हतं की एनडीएचा परिसर पुढील शतकभर भारताच्या सुरक्षेचं केंद्र बनेल.”
बाजीराव पेशव्यांचे अद्वितीय सैनिकी पराक्रम
अमित शाह यांनी बाजीरावांच्या लढवय्या कारकिर्दीचं जोरदार कौतुक करताना सांगितलं, “शाहू महाराजांनी १९ वर्षाच्या वयात बाजीरावांची सेनापती म्हणून निवड केली आणि त्यांनी २० वर्षांत ४१ युद्धं लढली – एकही हरले नाहीत. ही कामगिरी कोणत्याही सेनापतीच्या वाट्याला आलेली नाही.”
ते पुढे म्हणाले, “पावसाळ्यात युद्ध नसलं तरी वर्षात ८ महिन्यांत २ युद्धं जिंकणं, ही त्यांच्या युद्धकौशल्याची साक्ष आहे. युद्धात व्यूहरचना, त्वरा, समर्पण आणि बलिदान हे तत्व बाजीरावांनी आपल्या कर्तृत्वातून अधोरेखित केली.”
स्मारकासाठी एनडीए का योग्य?
“बाजीरावांचे पुतळे देशभरात आहेत, माझ्या गावातही आहेत; पण त्यांच्या स्मृतीचं स्मारक उभारायचं असेल, तर एनडीएसारखा जागा दुसरी नाही,” असे सांगत त्यांनी बाजीरावांच्या सैनिकी परंपरेला आधुनिक भारतीय लष्कराशी जोडले.
आजच्या युद्धपद्धतीत बाजीरावांचे तत्व लागू
अमित शाह म्हणाले, “आजही युद्धात जे मूलभूत तत्त्व महत्त्वाचं आहे – रणनीती, गती, निष्ठा व बलिदान – तीच तत्त्वं बाजीरावांच्या लढायांमध्ये दिसतात. हत्यारं बदलली, पण युद्धाची आत्मा तीच आहे. म्हणूनच बाजीरावांचा अभ्यास करणं ही देशसेवेची तयारी आहे.”
शिवाजी महाराजांपासून प्रेरणा
अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही गौरव करताना सांगितले, “१२ वर्षाच्या मुलाने एका अखंड भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्याचं प्रत्यक्षात रूपांतर केलं – ही महाराष्ट्राची प्रेरणादायी वारसा आहे.”
उपस्थित मान्यवर व वातावरण
या कार्यक्रमाला लष्करातील वरिष्ठ अधिकारी, एनडीएचे प्रशिक्षणार्थी, राज्यातील मंत्री आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते. बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण भव्य सोहळ्यात पार पडले. या वेळी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात त्यांच्या शौर्याचा जयघोष करण्यात आला.