बस्तवडेतील गैरहजर शिक्षकांना बडतर्फ करा

0
311

प्रशांत केदार : दलित महासंघाची शिक्षण आयुक्तांकडे तक्रार

माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : तालुक्यातील बस्तवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी रजा न काढता शाळेला ‘दांडी’ मारल्याने मुख्याध्यापिका विद्या मिरजकर, शिक्षिका दीपाली भोसले,शिक्षक दीपक माळी यांच्यावर तात्काळ निलंबनासह विभागीय चौकशी प्रस्तावित करून बडतर्फ करावे.अशी मागणी दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी महाराष्ट्र शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

शिक्षण आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दिनांक 15फेब्रुवारी रोजी बस्तवडे ता.तासगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मिरजकर यांच्या कुटुंबात साखरपुडा कार्यक्रम असल्याने त्या तीन दिवसांपूर्वीच रजा न घेता कोल्हापूरला गेल्या होत्या. सदर कार्यक्रमास जाण्याच्या तयारीत असणाऱ्या शिक्षिका दीपाली भोसले व शिक्षक दीपक माळी यांनीही रजेचा अर्ज न देता शाळेला दांडी मारली.परिणामी शाळेतील 65 विदयार्थी शिक्षकांनी बेजबाबदारपणे वाऱ्यावर सोडले.

 

शाळेतील झिरो शिक्षिका सरिता कदम यांनी सकाळी शाळा उघडली असून सकाळी 7.20 ते 10 पर्यंत ही शाळा शिक्षकाविना सुरू होती. शिक्षकाविना व्हरांड्यात बसलेले विद्यार्थी न्याय मागत असून शिक्षकांच्या या कृतीमुळे शिक्षण विभागाची बदनामी झाली आहे.जिल्हा परिषदेची शाळेत महत्वाची कागदपत्रे,दफतर असते तरी शाळेच्या चाव्या व विद्यार्थ्यांची जबाबदारी अनाधिकृत नेमलेल्या झिरो शिक्षिकेकडे सोपवून शिक्षक अशैक्षणिक कामात व्यस्त आहेत.गावच्या शाळा व्यवस्थापन समितीचे शाळेच्या कारभाराकडे अपेक्षित लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

 

 

सदर प्रकाराची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे हजेरी रजिस्टर तपासले असता,एकाही शिक्षकाने रजा काढली नसून रजेचा अर्जही नसल्याचे स्पष्ट झाले.मुख्याध्यापिका विद्या मिरजकर यांच्या आशीर्वादाने शाळेत शिक्षकांचा मनमानी,आलबेल कारभार सुरू आहे.रजेचा अर्जन करता ‘निर्भीडपणे दांड्या’ मारायची सवय शिक्षकांना जडली आहे.ही अतिशय गंभीर बाब आहे.सदर प्रकरणात शाळेतील गैरहजर शिक्षकांचा,शाळा व्यवस्थापन समिती,झिरो शिक्षिका सरिता कदम,शालेय पोषण आहार करणाऱ्या सविता शेळके यांचेकडून लेखी खुलासा घ्यावा.तसेच संबधित दोषी शिक्षकांवर 11 दिवसात कायदेशीर कठोर कारवाई करावी.अन्यथा शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनात दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here