माणदेश एक्सप्रेस न्युज/तासगाव : पाण्यासाठी सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे आटपाडी-सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. विसापूर-पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे तासाभरापासून रस्ता रोको केला आहे. या चक्काजामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुनदी योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे सावळज भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत. पाण्याच्या बाबतीत केले जाणारे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी सावळज शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे तासाभरापासून रास्ता रोको सुरू केला आहे. जोपर्यंत अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु तासगाव पोलिसांनी या ठिकाण धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.