
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड : माझे राजकारण संपले तरी चालेल, पण मी शरद पवार यांच्यासमोर कधीही झुकणार नाही, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माण तालुक्यातील आंधळी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि आपण मंत्री झाल्याचे पवारांना अजूनही मान्य होत नसल्याचा टोलाही लगावला.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, मी मंत्री झालोय हे पवारांना अजून मान्यच होईना. एकेकाळी माण-खटावच्या लोकांनी बारामतीच्या पवारांवर खूप प्रेम केले; पण जेव्हा सामान्य कुटुंबातील, एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आमदार झाला, तेव्हा बारामतीच्या लोकांना त्याचा त्रास झाला. मी मंत्री झाल्याचे तर त्यांना मान्यच नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी शरद पवारांशी तडजोड केली असेल; परंतु आपण एकमेव आहोत, जे पवारांपुढे कधीच झुकलो नाही. मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो, तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र, यामुळे आपल्या शेतात पाणी आलं नसतं. मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती, तर माण-खटावला पाणी मिळालं नसतं. आपला विरोध व्यक्ती म्हणून बारामतीला किंवा पवारांना नाही, तर ज्यांनी या तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवले त्यांना आहे, असेही ना. गोरे यांनी स्पष्ट केले.