इंग्लंडच्या दिग्गजाकडून अभिषेक शर्माच्या हिटिंग पॉवरचं कौतुक; “मी संपूर्ण कारकिर्दीत जेवढे षटकार मारले नाहीत, त्यापेक्षा अधिक षटकार अभिषेकनं दोन तासांत मारले”

0
211

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात युवराज सिंगचा चेला इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. टी-२० कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकवणाऱ्या अभिषेक शर्माच्या भात्यातून जवळपास १५ सामन्यानंतर शतक पाहायला मिळाले. या शतकी खेळीसर त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. यात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला. त्याच्या षटकारांची आतषबाजी पाहून इंग्लंडचा माजी क्रिकेटर सर ॲलिस्टर कुकही आवाक् झाला. त्याने भारताच्या युवा बॅटरची वानखेडेवरील दमदार खेळीवर मोठं वक्तव्य केले आहे.

 

इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटर सर ॲलिस्टर कुक याने अभिषेक शर्माच्या फटकेबाजीच कौतुक केलं आहे. अभिषेक शर्मानं दोन तासांत जेवढे षटकार मारले तेवढे षटकार मी माझ्या अख्ख्या कारकिर्दीत मारले नाहीत, अशा शब्दांत इंग्लंडच्या दिग्गजाने भारताच्या युवा बॅटरवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे. अभिषेक शर्मानं ५४ चेंडूत १३५ धावांच्या खेळीत १३ उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. या कामगिरीसह भारतीय ताफ्यातून टी-२० मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अभिषेक शर्मानं आपल्या नावे केला आहे.

 

 

अभिषेक शर्मावर कौतुकांचा वर्षाव करणारा इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटर कुक हा कसोटीपटू म्हणून ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीतील १६१ कसोटी सामन्यात त्याने ११ षटकार मारले आहेत. इंग्लंडकडून ९२ वनडेत त्याच्या खात्यात १० षटकारांची नोंद असून ४ टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून एकही षटकार पाहायला मिळाला नाही. वनडे कारकिर्दीत आणि कसोटी कारकिर्दीत त्याच्या भात्यातून जेवढे षटकार निघालेले नाहीत त्यापेक्षा अधिक षटकार अभिषेक शर्मानं टी-२० सामन्यातील आपल्या एका डावात मारले.

 

 

अभिषेक शर्मान १७ चेंडूत अर्धशतक साजरे केले. भारताकडून टी-२० क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. ३७ चेंडूत शतक साजरे करताना त्याने भारताकडून दुसरे जलद शतक साजरे केले. एवढेच नाही तर इंग्लंड विरुद्ध सर्वातत जलद शतक साजरे करणारा क्रिकेट जगतातील तो पहिला फलंदाजही ठरलाय. याशिवाय अभिषेक शर्मानं १३५ धावांच्या खेळीसह भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्डही सेट केलाय. एका डावात भारताकडून सर्वाधिक १३ षटकार मारण्याचा रेकॉर्डही आता त्याच्या नावे झालाय.