“एकनाथ शिंदे राजकीय मनोरुग्ण, नरेंद्र मोदींचं सरकार हे कुबड्यांवरचं”; संजय राऊत यांची टीका

0
11

 

महाराष्ट्रातल्या सरकारबाबत आणि केंद्र सरकारबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्रातलं सरकार हे अल्पमतातलं सरकार आहे, कुबड्यांवरचं सरकार आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच त्यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. मोदी, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंविरोधात टीकेचे बाण चालवले आहेत. हे सरकार घटनाबाह्य आहे असंही संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदींचं सरकार हे कुबड्यांवरचं
केंद्रातलं सरकार हे अल्पमतातलं आहे. तरीही हे सरकार स्वतःची पाठ थोपटून घेतं आहे. आम्हाला यावर चर्चा करावी लागेल. यावेळची संसद वेगळी आहे. त्याचं प्रतिबिंब राज्यसभेतही पाहण्यास मिळेल. भाजपाने बहुमत गमावलं आहे. कुबड्यांवरचे पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट आपल्याला पाहावं लागतं आहे. सूंभ जळाला तरीही पीळ जळत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न नक्की होईल. आम्ही तेच आहोत हे भासवलं जाईल. मात्र हा पीळ उतरवण्याचं काम विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतील याची आम्हाला खात्री आहे.

खूप वर्षांनी लोकांच्या मनातला विरोधी पक्षनेता मिळाला आहे
खूप वर्षांनी जनतेच्या मनातला विरोधी पक्षनेता देशाला मिळाला आहे. राहुल गांधी संपूर्ण देश पायी फिरले. देशातल्या लोकांशी संवाद साधला, प्रश्न जाणून घेतले. मागच्या दहा वर्षांत ज्यांनी घाव सोसले, अपमानाचे कडू घोट त्यांनी पचवले. हलाहल पचवून राहुल गांधींसारखा नेता नरेंद्र मोदींसमोर आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे. लोकसभेचं कामकाज कसं होतं याकडे आता देशाचं लक्ष आहे. मागच्या दहा वर्षात फक्त सरकारचा टाळकुटेपणा होता. एकतर्फी सरकारचं भजन पाहण्यात लोकांना रस नव्हता, आता विरोधी पक्ष आणि सरकारमधला सामना लोकांना पाहण्यास मिळेल. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून मागची दहा वर्षे..
नरेंद्र मोदी लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून मागची दहा वर्षे आपली सत्ता गाजवत होते. जनतेचा आणि विरोधी पक्षाचा आवाज त्यांनी दाबला. आत्ताही तो प्रयत्न होईल. राहुल गांधी ठामपणे उभे राहिले. राहुल गांधींची ओळख त्यांनी ओम बिर्लांना करुन दिली. त्यापूर्वी त्यांनी कोण राहुल गांधी असा प्रश्न निवडणूक प्रचारादरम्यान विचारला होता. मात्र लोकशाहीची ताकद काय? ते संसदेत दिसलं. राहुल गांधींना अपमानित करण्यात आलं, कोण राहुल गांधी, कोण शहजादा? हे प्रश्न विचारले गेले होते. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ. उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणाले होते. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर डुप्लिकेट म्हणून टीका केली होती. आता डुप्लिकेट म्हणत असलेला हा माल किती असली आहे हे आम्ही दाखवून देऊ असाही टोला संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीत चर्चा सुरु असतात, हुकूमशाहीतही चर्चा होते. हिटलर, मुसोलिनी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीत चर्चेला वाव असतो. इंडिया आघाडीतले नेते आशावादी आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते यांना धडा घ्यायचा असेल तर त्यांनी लोकशाहीचे संकेत पाळले पाहिजेत.

एकनाथ शिंदे राजकीय मनोरुग्ण
एकनाथ शिंदे सध्या स्ट्राईक रेटबद्दल बोलत आहेत. त्यांचं बोलणं फार मनावर घेण्याची गरज नाही. हे भरकटलेले लोक आहेत. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद औट घटकेचं आहे. एकनाथ शिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. घटनाबाह्य, बेकायदेशीरपणे जे लोक सत्तेवर असतात त्यांना मानसिक आजार असतो. असे लोक मनोरुग्ण असतात. बहुमत गमावलेले लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा त्यांच्याकडून अशी वक्तव्यं होतात त्यामुळे एकनाथ शिंदे स्ट्राईक रेटबद्दल वगैरे बोलत असतील तर त्याकडे लक्ष देऊ नका. देवेंद्र फडणवीसांना खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश करायचा असेल तर त्यांनी ती सुरुवात नरेंद्र मोदींपासून करायला हवी. कारण दहा वर्षे ते लोकांना नरेंद्र मोदी करत आहेत. भाजपाचं राजकारण खोट्या नरेटिव्ह भोवतीच फिरतं आहे असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं. पेपरफुटीचं बोलत आहेत, आणीबाणीचं बोलत आहेत. आत्ताच्या हुकूमशाहीवर नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? दडपशाही सुरु आहे त्यावर बोललं पाहिजे. पेपरफुटीवर नरेंद्र मोदींनी बोललं पाहिजे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.