मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्योपूर जिल्ह्यात अचानक शनिवारी आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत पलटली. बोटीतून 11 जण प्रवास करत होते. या घटनेत एकूण तीन मुलांसह 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 4 जणांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. एसडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरु झाले. त्यांनी पाण्यातून सात मृतदेह बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, मानपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जैनी येथील क्षेत्रपाल बाबाच्या ठिकाणी प्रसाद कार्यक्रमासाठी आलेले विजापूर गावातील ११ जण बोटीतून प्रवास करत होते. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे बोट नदीच्या प्रवाहात बुडाली. हे ११ जण बोटीने सीप नदी ओलांडून सारोजा गावातील नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळीस ही घटना घडली. या दुर्घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
अचानक वादळ आले आणि अनियंत्रित होऊन बोट नदीत उलटली. ११ जण नदीत बुडत होते. त्यापैकी ४ जणांनी आपला जीव कसाबसा वाचवत नदीच्या किनाऱ्याजवळ पोहचले. परंतु ७ जण नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. त्यांनी सात मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. परशुराम, आरती, पार्वती, भुपेंद्र, श्याम, रविंद्र, लाली हे सात जण नदीत बुडाले. या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांनी घटनास्थळी जाऊन निर्देश केले आहे. घटनास्थळी जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.