राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही अपेक्षेप्रमाणे पाऊस अजून झालेला नाही. अजूनही महाराष्ट्रात उकाडा जाणवत आहे. पाण्याची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. त्याचा फटका पिकांना होत आहे. पाण्याअभावी काही ठिकाणी पालेभाज्या सुकून गेल्या आहेत. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. सध्या घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती 80 ते 100 रुपये किलो झाल्या आहेत. काही भाज्यांचे दर तर शंभरीपार गेले आहेत. मागणीच्या तुलनेत फक्त 60 टक्केच भाजीपाल्याची आवक बाजारात होत आहे.
सध्याचे वातावरणदेखील भाज्यांच्या पिकासाठी चांगले नाहीये. ढगाळ वातावरणामुळे भाज्यांवर रोग पडत आहे. त्यामुळे अजून महिनाभर भाज्यांची कमतरता जाणवणार आहे. कांदा बटाट्याचे भाव डबल झाले आहेत. बटाट 40 ते 50 रु विकला जात आहे. कांदा 50 रुपयांना विकला जात आहे. राज्यात घाऊक बाजारात भेंडी 45 ते 50 रुपयांना विकली जात आहे. तर किरकोळ बाजारात भेंडी 120-140 रुपयांना विकली जात आहे. फरसबी किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपयांना विकली जात आहे. गवार 100 रुपयांना विकली जात आहे. घेवडा 120 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.
भाज्यांसोबत हिरवा मसाला, अद्रकचेही दर वाढले आहे. कोथिंबीरीची जुडी महागली आहे. हिरवा मसाला १० रुपयांना मिळायचा. तर तो आता 20 रुपयांना मिळत आहे. शिमला मिरची 80-90 रुपयांना विकली जात आहे. शेवग्याची शेंग 100 ते 120 रुपये प्रति किलो विकली जात आहे. हिरवा वाटणा 120-180 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. हिरवी मिरची 100 ते 120 रुपयांना विकली जात आहे. भाज्यांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.