महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद (BJP National President) रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करुन भाजप पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेची मोट पुन्हा नव्याने बांधायची असल्याचे फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. त्यासाठी मला राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी विनंती फडणवीसांनी केली होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना आता थेट दिल्लीतच बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे. संघटन कौशल्य, निवडणुकीची रणनीती आखण्याचा भाग असो किंवा कोणत्याही राजकीय संकटातून पक्षाला सहीसलामत बाहेर काढण्याचा विषय असो, या सगळ्याबाबत सध्याच्या घडीला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करणारे मोजके नेते आहेत. फडणवीसांचा हाच आवाका आणि क्षमतांचा वापर राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेसाठी करुन घेता येईल, अशी भाजप नेतृत्त्वाची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला कधी बोलावले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात राहणार?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आणखी एका पर्यायाचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे. फडणवीस यांना सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष करावे आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवावे आणि निवडणुकीनंतर पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष करावे या पर्यायावरदेखील पक्षाचे नेतृत्व विचार करत असल्याचे समजते. दुसरा पर्याय म्हणजे आता लगेच देवेंद्र फडणवीस यांना हंगामी राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाऊ शकते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे याबाबत पक्षाकडून काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.