एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावे या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे राज्यात वातावरण तापत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये हा आमचा उद्देश आहे, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आज आमची सह्याद्रीवर संध्याकाळी बैठक आहे. आमचं अहित केलं असं कोणत्याही समाजाला वाटू नये. कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवणार आहे.
पोलीस भरतीवर फडणवीस म्हणाले…
पोलीस भरतीवर फडणवीस म्हणाले, आगामी काळात पाऊस वाढणार आहे. आचार संहिता येणार आहे. या चाचण्या पुढे गेल्यातर अनेकांवर अन्याय होईल. जिथे पाऊस आहे त्यांना पुढच्या तारखा दिल्या आहेत. पाऊस पुढे वाढणार आहे. आचारसंहिता लागेल त्यामुळे चाचणी पुढे गेली तर मुलांचे वय निघून जाईल. दुसरी संधी मिळणार नाही.
सह्याद्रीवर आज बैठकीचे आयोजन
सरकारच्य शिष्टमंडळाकडून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र ते उपोषणावर ठाम आहेत. यानंतर गिरीश महाजन यांनी हाके आणि वाघमारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलकांचे शिष्टमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत काय निघणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
ओबीसी आंदोलकांचं एक शिष्टमंडळ संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
सरकारच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री इथे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. आता ओबीसी आंदोलकांचं एक शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. शिष्टमंडळात आंदोलकांच्या मागणीप्रमाणे मंत्री भुजबळ, आणि आमदार गोपीचंद पडळकर असतील. मराठा समाजाला 54 लाख नोंदींप्रमाणे दिलेलं कुणबी आरक्षण रद्द करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे सरकारने लेखी द्यावं तरच आंदोलन मागे घेण्यात येईल अशी मागणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे यांनी केलीय. दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री इथे दाखल झालं असता आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.