‘महाराजांच्या नावाला साजेस स्मारक या ठिकाणी पुन्हा उभा करू’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
61

मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना साजेसे स्मारक उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तसा निर्णय झाला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर भेट दिल्यानंतर म्हटले आहे. ते म्हणाले, महाराजांबद्दल बोलताना, वागताना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे. महाराष्ट्र राज्याची संस्कृती जोपासली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत. प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासाबद्दल अभिमान आहे. यावेळी अजित पवार यांनी म्हणाले, मी जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी पुतळा दुर्घटनेची गांभीर्याने चौकशी केली. यावेळी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता अजित पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुतळा कोसळण्याची घटना दुर्देवी आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. सामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेता महाराजांच्या नावाला साजेस स्मारक या ठिकाणी पुन्हा उभा करण्यात येईल. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी कशा पद्धतीचे काम केलं आहे तसेच इतर ठिकाणी कसे काम केले आहे याचाही विचार करून शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाणार आहे. शिल्पकार राम सुतार यांचाही सल्ला घेतला जात आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here