सर्वांच्या स्वप्नांचा आज चुरडा! विनेशने वजन कमी करण्यासाठी केस कापले, रक्तही काढलं, पण शेवटी होत्याचं नव्हतं झालंच

0
434

कोट्यवधी भारतीय जिच्या सुवर्णभरारीसाठी प्रार्थना करत होते, त्या सर्वांच्या स्वप्नांचा आज चुरडा झाला आहे. भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटहिला वाढलेल्या वजनामुळे ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरली आहे. मंगळवारी रात्री 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगटचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री विनेश फोगटचं वजन तब्बल 2 किलो जास्त होतं आणि तिनं ते कमी करण्यासाठी खूप मेहनतही घेतली. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिनं सेमीफायनल मॅच जिंकली तेव्हा तिचं वजन सुमारे 52 किलो होतं आणि नंतर तिचे वजन 2 किलोनं कमी करण्यासाठी तिनं तिचं रक्त देखील काढलं.

लक्ष्य गाठण्यासाठी तिनं रक्तही काढलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटनं सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही. तिनं रात्रभर जागून तिचं अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. स्पोर्ट्स स्टारच्या रिपोर्टनुसार, विनेश फोगटनं वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केली, तिनं स्किपिंग केली. एवढंच नाही तर या खेळाडूनं आपले केस आणि नखंही कापली. धक्कादायक बाब म्हणजे, एवढं असूनही विनेशला निर्धारित मर्यादा गाठता आली नाही.

कुस्तीमधील वजनाचा नियम काय?
कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची सूट मिळते. म्हणजेच, विनेशचं वजन 50 किलो 100 ग्रॅम असतं, तर ती सुवर्णपदकाची लढत खेळू शकली असती, पण तिचं वजन त्याव्यतिरिक्त आणखी 50 ग्रॅम जास्त होतं आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी पैलवानांचे वजन केले जाते. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपले वजन 2 दिवस राखायचे आहे परंतु विनेशला तसे करता आले नाही. रिपोर्ट्सनुसार, तिचं वजन 52 किलोपर्यंत पोहोचलं होतं, तिनं ते कमी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी ती अपयशी ठरली.

नेमकं काय घडलं?
विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.